India GDP Growth Rate: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर २५ टक्के टॅरिफ लादल्याने चालू आर्थिक वर्षात भारताच्या जीडीपीचा विकास दर सहा टक्क्यांपेक्षा खाली घसरण्याची शक्यता आहे. याबाबत इंडियन एक्सप्रेसने अर्थतज्ज्ञांच्या हवाल्याने वृत्त दिले आहे. दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतासह ७० देशांवर १० ते ४१ टक्के टॅरिफ लादले आहे. नवीन टॅरिफ अंतर्गत भारताला अमेरिकेला होणाऱ्या निर्यातीवर २५ टक्के कर द्यावा लागणार आहे.
ट्रम्प यांच्या या निर्णयानंतर बहुतेक अर्थतज्ज्ञांनी असा अंदाज व्यक्त केला आहे की, भारताच्या जीडीपी विकास दरावर २०–४० बेसिस पॉइंट्सचा फटका बसेल.
इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, अमेरिकेने भारतावर लादलेला २५ टक्के टॅरिफ २०२५–२६ या आर्थिक वर्षाच्या उर्वरित काळात कायम राहिल्यास जीडीपीच्या विकास दर वाढीत ४० बेसिस पॉइंट्सची घट होऊ शकते.
चालू आर्थिक वर्षात भारताच्या जीडीपीचा विकास दर ६.१ टक्क्यांनी वाढण्याचा अंदाज आहे, जो रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या ६.५ टक्के आणि अर्थ मंत्रालयाच्या ६.३–६.८ टक्के अंदाज श्रेणीपेक्षा कमी आहे, असे एएनझेडच्या अर्थशास्त्रज्ञांच्या हवाल्याने म्हटले आहे.
भारतीय अर्थव्यवस्था मंदावल्याची शक्यता
२०२४–२५ च्या शेवटच्या तिमाहीत ७.४ टक्के इतका अनपेक्षितपणे उच्च जीडीपी विकास दर नोंदवल्यानंतर, एप्रिल–जूनमध्ये भारतीय अर्थव्यवस्था मंदावल्याची शक्यता आहे. सांख्यिकी मंत्रालय ऑगस्टच्या अखेरीस एप्रिल–जूनसाठी जीडीपी आकडेवारी जाहीर करणार आहे.
निर्यात ३० अब्ज डॉलर्सने कमी होण्याची शक्यता
“निश्चितच, अमेरिका हा भारताचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार आहे. भारतातून अमेरिकेत सुमारे १८ टक्के निर्यात होते. पण, भारतीय अर्थव्यवस्था बहुतेक देशांपेक्षा तुलनेने अधिक देशांतर्गत केंद्रित असून, व्यापारावर खूपच कमी अवलंबून आहे, असे मूडीज अॅनालिटिक्सच्या असोसिएट इकॉनॉमिस्ट अदिती रमन म्हणाल्या.
एमके ग्लोबल फायनान्शियल सर्व्हिसेसच्या मते, २५ टक्क्यांपेक्षा जास्त टॅरिफ पातळीवर अमेरिकेला भारताची निर्यात ३० अब्ज डॉलर्स ते ३३ अब्ज डॉलर्सने कमी होऊ शकते.
भारत आमचा मित्र असला तरी…
अमेरिकेची भारतासोबत मोठी व्यापारतूट असल्याचे जाहीर करताना ट्रम्प म्हणाले होते की, “भारत आमचा मित्र असला तरी, गेल्या काही वर्षांत आम्ही त्यांच्याशी तुलनेने कमी व्यापार केला आहे कारण त्यांचे टॅरिफ शुल्क खूप जास्त आणि जगातील सर्वात जास्त आहे. त्यांच्याकडे कोणत्याही देशापेक्षा सर्वात कठीण व्यापार अडथळे आहेत.”