सरलेल्या आठवड्यात, जागतिक भांडवली बाजारात गुंतवणूकदारांनी सावध पवित्रा धारण केल्याचे दिसून आले. त्याला कारण अमेरिकेत एकीकडे रोजगारस्थितीत सुधाराचे चित्र, तर दुसरीकडे तेथील मध्यवर्ती बँक – फेडरल रिझव्‍‌र्हमार्फत अधिकृतपणे करण्यात आलेले भडक स्वरूपाचे भाष्य. यातून तेथे पुढेही व्याजदर वाढीची मात्रा अधिक राहण्याच्या चिंतेने गुंतवणूकदारांच्या मनात घर केले. तथापि नोव्हेंबर महिन्यांतील अमेरिकेतील चलनवाढीचे प्रमाण १३ डिसेंबर रोजी तर पुढील फेडरल रिझव्‍‌र्हची व्याजदरासंबंधी पुढे बैठकही १३-१४ डिसेंबर रोजी होत आहे. त्यातून काय पुढे येते हे तेव्हाच पाहावे लागेल.

ब्रिटन सध्या भीषण परिस्थितीचा सामना करत आहे. २०१६ मध्ये युरोपीय महासंघ सोडण्याचा निर्णय घेतल्यानंतर ब्रिटनच्या आर्थिक समस्या सुरू झाल्या. परंतु करोना महासाथ आणि रशियाच्या युक्रेनवरील आक्रमणामुळे ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेतील तणाव वाढत गेला. युक्रेन युद्धामुळे ऊर्जेच्या टंचाई आणि किंमतवाढीमुळे ब्रिटनला महागाईचा सामना करावा लागत आहे. जुलै ते सप्टेंबर दरम्यान, ब्रिटनचे सकल देशांतर्गत उत्पादन (जीडीपी) ०.२ टक्क्यांनी आक्रसले. परिणामी गेल्या आठवड्यात तेथील अर्थसंकल्पात सुमारे ३० अब्ज पौंडाची खर्चात कपात आणि पुढील पाच वर्षांत २४ अब्ज पौंड इतक्या कर वाढीच्या तरतुदी करण्यात आल्या.

gold silver price
Gold-Silver Price on 27 April 2024: सोन्याचा भाव पाहून ग्राहकांच्या चेहऱ्यावर आनंद, १० ग्रॅमचा दर वाचून बाजारात गर्दी
Request for application from Reserve Bank to Small Finance Bank for conversion to regular banks
नियमित बँकांमध्ये रूपांतरणासाठी रिझर्व्ह बँकेकडून लघुवित्त बँकाकडे अर्जाची मागणी
Global market opened by Amazon to 15 thousand small businessmen of the state
राज्यातील १५ हजार लघु-व्यवसायिकांना ‘ॲमेझॉन’कडून जागतिक बाजारपेठ खुली
The country foreign exchange reserves have dwindled due to the depreciation of the rupee against the dollar
घसरत्या रुपयाची परकीय गंगाजळीला झळ

करोनाने चीनचा पाठलाग कायम राखला असून, सात महिन्यांत सर्वात मोठी करोना रुग्णांची नोंद तेथे गेल्या आठवड्यात झाली. वाढत्या संक्रमणाने तेथे पुन्हा टाळेबंदीसारख्या उपायांबद्दल व त्या परिणामी आर्थिक वाढीला गंभीरपणे खीळ बसण्याची चिंता बळावली आहे. याच आठवड्यात प्रसिद्ध झालेल्या चीनमधील अर्थव्यवस्थेतील कमकुवतपणा दर्शवणाऱ्या आकडेवारीतून हे दिसून आले.

देशांतर्गत भांडवली बाजारात विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांचा सहभाग वाढल्याने अलिकडच्या दिवसात बाजारातील आत्मविश्वास लक्षणीयरीत्या वाढला आहे. चलनवाढीचा प्रकोपही थंडावत चालला आहे. विदेशी गुंतवणूकदार देशांतर्गत बाजारपेठेत खरेदी करत असल्याचे दिसून येते. कंपन्यांचे तिमाही निकाल हे मोठ्या प्रमाणात अपेक्षेनुसार आले असून, निकालांचा हंगाम शेवटच्या टप्प्यांत आहे. त्यामुळे बाजारासाठी दिशादर्शक ठरेल अशी कोणतीही विशेष घटनांचा येत्या आठवड्यात अभाव असेल. तथापि नवीन कंपन्यांच्या ‘आयपीओ’ आणि त्यासाठी ठरणाऱ्या किमती व लावल्या जाणाऱ्या बोली ही बाजारासाठी औत्सुक्याचे ठरेल. तर आठवड्याभरापूर्वी ‘आयपीओ’ द्वारे गुंतवणूकदारांना आजमावणाऱ्या कंपन्यांच्या समभाग अधिमूल्यासह अथवा घसरणीसह बाजारात पर्दापण करतील काय, ही देखील उत्सुकतेची गोष्ट असेल. शिवाय, ३एम इंडिया (८५०० टक्के), हिंदुस्तान झिंक (७७५ टक्के), ईआयडी पॅरी (५५० टक्के), पॉलिप्लेक्स कॉर्पोरेशन (२०० टक्के + ३५० टक्के) या कंपन्यांच्या भागधारकांना लाभांशरूपात मोठा धनलाभही होऊ घातला आहे.

सोमवार, २१ नोव्हेंबर २०२२
० ‘आयपीओ’पश्चात सूचिबद्धता : ‘आयपीओ’ द्वारे गुंतवणूकदारांना आजमावणाऱ्या आर्चियन केमिकल इंडस्ट्रीज आणि फाइव्ह स्टार बिझनेस फायनान्स या दोन कंपन्यांच्या समभाग सोमवारी सकाळी बाजारात विधिवत सूचिबद्ध होतील. यापैकी फाइव्ह स्टार बिझनेस फायनान्सच्या भागविक्रीबाबत गुंतवणूकदारांमध्ये निरुत्साह दिसला होता.
० चीनमधील व्याजदराचा निर्णय : पिपल्स बँक ऑफ चायना या मध्यवर्ती बँकेच्या ऑक्टोबरमधील ‘जैसे थे’ धोरणानंतर, नोव्हेंबरमध्ये ती व्याजदरात कोणते बदल करू इच्छिते अथवा नाही, हे सोमवारी जाहीर होणाऱ्या पतधोरणातून स्पष्ट होईल.

मंगळवार, २२ नोव्हेंबर २०२२
० ‘आयपीओ’पश्चात सूचिबद्धता – ‘आयपीओ’ द्वारे गुंतवणूकदारांना आजमावणाऱ्या केन्स टेक्नॉलॉजीजचे समभाग मंगळवारी सकाळी बाजारात सूचिबद्ध होतील. ‘आयपीओ’साठी झालेला ३४ पट भरणा हा कंपनीच्या समभागांबाबत गुंतवणूकदारांमधील दांडगा आशावाद स्पष्ट करतो.
० ‘वेदान्त लिमिटेड’चा लाभांश : कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक मंगळवारी होत असून, २०२२-२३ साठी भागधारकांना द्यावयाच्या अंतरिम लाभांशासंबंधी निर्णय विषयपत्रिकेवर आहे.

बुधवार, २३ नोव्हेंबर २०२२
० ‘आयपीओ’पश्चात सूचिबद्धता : आयनॉक्स ग्रीन एनर्जी सर्व्हिसेस या आठवड्यापूर्वी ‘आयपीओ’ घेऊन आलेल्या आणि गुंतवणूकदारांकडून जेमतेम प्रतिसाद मिळविलेल्या कंपनीचे समभाग बुधवारी सकाळी बाजारात विधिवत सूचिबद्ध होतील.
० प्रमुख अर्थव्यवस्थांसाठी ‘पीएमआय’ आकडेवारी : ब्रिटनसह, युरोपीय क्षेत्र, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, फान्स या जगातील प्रमुख अर्थव्यवस्थांची चालक शक्ती असणाऱ्या निर्मिती तसेच सेवा उद्योगातील खरेदी व्यवस्थापकांचा कल दर्शविणाऱ्या ‘फ्लॅश पीएमआय’ निर्देशांकाची घोषणा केली जाईल.

गुरुवार, २४ नोव्हेंबर २०२२
० ‘आयपीओ’पश्चात सूचिबद्धता : ‘रुस्तमजी’ या नावाने मुंबई व परिसरात स्थावर मालमत्ता प्रकल्प राबवणाऱ्या कीस्टोन रिअँल्टर्स या आठवड्यापूर्वी ‘आयपीओ’ घेऊन आलेल्या आणि गुंतवणूकदारांकडून जवळपास दुपटीने भरणा करणारा प्रतिसाद मिळविलेल्या कंपनीचे समभाग सकाळी बाजारात सूचिबद्ध होतील.
० अमेरिकेच्या मध्यवर्ती बँक – फेडरल रिझर्व्हच्या १-२ नोव्हेंबरला झालेल्या बैठकीचे इतिवृत्ताला प्रसिद्धी दिली जाईल.
० दक्षिण कोरिया, दक्षिण आफ्रिका, तुर्कस्तान, अर्जेंटिना या देशांच्या मध्यवर्ती बँका त्यांच्या अर्थव्यवस्थेच्या स्थितीनुरूप व्याजाच्या दरासंबंधी निर्णय घेतील.

शुक्रवार, २५ नोव्हेंबर २०२२
जर्मनी आणि ब्रिटन या प्रमुख अर्थव्यवस्थांमधील ग्राहकांचे मनोबल आणि आत्मविश्वास जोखणारी आकडेवारी जाहीर केली जाईल. आधीच्या महिन्यांमध्ये दोन्ही देशांमध्ये ग्राहकांचे मनोबल उत्तरोत्तर सुधारत आले आहे..


धन-लाभ
(प्रमुख कंपन्यांकडून जाहीर लाभांश, त्यांच्या तारखा व प्रमाण)

२१ नोव्हेंबर २०२२ :
बालकृष्ण इंडस्ट्रीज (२०० टक्के)
३एम इंडिया (८५०० टक्के)
नॅटको फार्मा (३७.५ टक्के)
ऑइल इंडिया (४५ टक्के)
कोचीन शिपयार्ड (७० टक्के)
ओएनजीसी (१३५ टक्के)
माझगांव डॉक (९१ टक्के)
पेट्रोनेट एलएनजी (७० टक्के)

२२ नोव्हेंबर २०२२ :
ईआयडी पॅरी (५५० टक्के)
जीई शिपिंग कंपनी (७२ टक्के)
इप्का लॅब (४०० टक्के)
मनप्पुरम फायनान्स (३७.५ टक्के)
कंटेनर कॉर्पोरेशन (६० टक्के)
हिंदुस्तान झिंक (७७५ टक्के)
भारत फोर्ज (७५ टक्के)
पॉलिप्लेक्स कॉर्पोरेशन (२०० टक्के + ३५० टक्के)
जेएम फायनान्शियल (९० टक्के)
पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन (३० टक्के)