Elon Musk $1 Trillion Tesla Pay Package: टेस्लाचे मुख्य कार्यकारी अधिकारी एलॉन मस्क सातत्याने या ना त्या कारणामुळे चर्चेत असतात. आता ते त्यांना टेस्लाकडून मिळणाऱ्या पगारामुळे चर्चेत आले आहेत. कारण टेस्लाच्या शेअरहोल्डर्सनी नुकतेच एलॉन मस्क यांच्या अब्जावधी डॉलर्सच्या सॅलरी पॅकेजला मंजुरी दिली आहे. जर एलॉन मस्क यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून टेस्लाची दीर्घकालीन कामगिरीची उद्दिष्टे पूर्ण केली, तर त्यांना १ ट्रिलियन डॉलर्सपर्यंत (एक लाख कोटी डॉलर्स) पगार मिळणार आहे. काल (गुरुवारी) झालेल्या बैठकीत ७५ टक्क्यांपेक्षा जास्त शेअरहोल्डर्सनी मस्क यांच्या सॅलरी पॅकेजला पाठिंबा दिला.
या निर्णयानंतर व्यासपीठावर आलेले एलॉन मस्क म्हणाले की, “आपण ज्याची सुरुवात करणार आहोत तो टेस्लाच्या भविष्यातील केवळ एक नवीन अध्याय नाही, तर एक संपूर्ण नवीन पुस्तक आहे.” याचबरोबर मस्क यांनी रोबोटबरोबर नृत्यही केल्याचे पाहायला मिळाले.
एलॉन मस्क यांना जास्तीत जास्त काळ टेस्लामध्ये ठेवण्यासाठी या सॅलरी पॅकेजची योजना आखण्यात आली आहे, जेणेकरून ते कंपनीसाठी निश्चित केलेली तांत्रिक उद्दिष्टे पूर्ण करू शकतील. मस्क यांनी म्हटले आहे की, एआय, सेल्फ-ड्रायव्हिंग तंत्रज्ञान आणि रोबोटिक्ससारख्या क्षेत्रांत टेस्लाची प्रगती त्यांना स्पर्धकांपेक्षा पुढे नेईल. जर मस्क यांनी या योजनेतील सर्व उद्दिष्टे पूर्ण केली, तर ते जगातील पहिले ट्रिलियनिअर बनू शकतात.
या सॅलरी पॅकेजच्या कराराच्या अटींनुसार, जर मस्क यांनी पुढील दशकात दरवर्षी २ कोटी वाहने, १ कोटी रोबोटॅक्सी आणि १ कोटी ह्युमनॉइड रोबोट वितरित केले व वार्षिक ४०० अब्ज डॉलर्सचा नफा मिळवून दिला, तर त्यांना टेस्लामध्ये अतिरिक्त १२ टक्के हिस्साही मिळणार आहे.
…तरच मिळणार १ ट्रिलियन डॉलर्स पगार
एलॉन मस्क यांनी टेस्लाची आवश्यक ऑपरेशनल आणि आर्थिक उद्दिष्टे साध्य केल्यासच त्यांना १ ट्रिलियन डॉलर्स पगार मिळणार आहे. या उद्दिष्टांमध्ये १० वर्षांच्या आत २ कोटी वाहनांच्या निर्मितीचाही समावेश आहे. गेल्या १२ वर्षांत टेस्लाने उत्पादित केलेल्या वाहनांच्या संख्येपेक्षा ही संख्या दुप्पट आहे. त्यांना कंपनीचे बाजारमूल्य आणि नफा देखील वाढवावा लागेल.
जरी मस्क यांनी प्रत्येक उद्दिष्ट गाठले नाही, तरीही त्यांना मोठा पगार मिळू शकतो. जर त्यांनी कंपनीचे बाजारमूल्य ८० टक्क्यांनी वाढवले, वाहन विक्री दुप्पट केली आणि नफा तिप्पट केला किंवा इतर कोणतीही दोन उद्दिष्टे पूर्ण केली, तर त्यांना टेस्लाच्या शेअर्समध्ये ५० अब्ज डॉलर्सचा हिस्सा मिळेल.
