एक्स्प्रेस वृत्त

मुंबई: भांडवली बाजारातील सूचिबद्ध कंपन्या आणि बँकांकडून रोखे बाजारातून चालू महिन्याच्या सुरुवातीपासून, २२ सप्टेंबरपर्यंत ३१,००० कोटी रुपयांपेक्षा अधिक निधी उभारला आहे. येत्या काही दिवसांत आणखी १८,१०१ कोटी रुपयांची निधी उभारणी प्रस्तावित असून, सप्टेंबरमध्ये रोखे बाजारातून एकंदर ५०,००० कोटी रुपयांचा निधी उभारला जाऊ शकतो.

आर्थिक वर्षाच्या सुरुवातीपासून, रोखे बाजाराच्या माध्यमातून मासिक ५०,००० कोटींहून अधिक निधी तीनदा उभारण्यात आला आहे. याआधी एप्रिल महिन्यात, ५२,००० कोटींहून अधिक निधी उभारण्यात आला होता, तर जूनमध्ये सर्वाधिक १ लाख कोटी रुपयांहून अधिक निधी उभारला गेला. तर चालू आठवड्यात आरईसी लिमिटेड, श्री सिमेंट, एचडीएफसी अर्गो, गोदरेज इंडस्ट्रीज आणि एनएनपी कन्स्ट्रक्शन्स या कंपन्यांकडून रोखे बाजारातून एकत्रित ४,६०० कोटींची निधी उभारणी शक्य आहे.

हेही वाचा… रिझर्व्ह बँकेकडून द कपोल सहकारी बँकेचा परवाना रद्द

“एएए मानांकनप्राप्त रोखे वार्षिक आधारावर ७.४५ ते ७.८० टक्क्यांच्या व्याज (कूपन) दरावर रोखे बाजारातून मोठी रक्कम मिळवू शकतात, जे सध्या बँकेच्या कर्ज दरापेक्षा खूपच स्वस्त आहे. शिवाय सध्या व्याजदर चक्राच्या शिखरावर असल्याने, नजीकच्या भविष्यात रोखे उत्पन्नात मोठी वाढ अपेक्षित नाही. परिणामी कमी मानांकनप्राप्त रोखे जारीकर्त्यांना निधी उभारणीसाठी अजूनही स्पर्धात्मक किमतींचा सामना करावा लागतो आहे,” असे मत कर्ज सल्लागार संस्था रॉकफोर्ट फिनकॅपचे संस्थापक आणि व्यवस्थापकीय भागीदार वेंकटकृष्णन श्रीनिवासन यांनी व्यक्त केले.

हेही वाचा… बाजारातील माणसं – ‘हमारा बजाज’ राहुल बजाज

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंजाब नॅशनल बँकेने शाश्वत रोखे माधमातून ३,००० कोटी रुपयांपर्यंत, कॅनरा बँकेने १० वर्षे मुदतीच्या पायाभूत सुविधा रोख्यांद्वारे ५,००० कोटी रुपये आणि नाबार्डने पाच वर्षांच्या सामाजिक प्रभाव रोख्यांद्वारे ३,००० कोटी रुपये उभारले आहेत. तर देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँकेने शुक्रवारी पायाभूत सुविधा रोख्यांच्या चौथ्या फेरीत ७.४९ टक्के कूपन दराने १०,००० कोटी रुपये उभे केले. या रोख्यांना २१,०४५ कोटी रुपयांच्या बोली प्राप्त झाल्या होत्या आणि ४,००० कोटी रुपयांच्या मूळ आकाराच्या तुलनेत ५ पट अधिक प्रतिसाद मिळाला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जागतिक पातळीवर ‘आयपीओ’साठी निरुत्साह

जागतिक पातळीवर प्रारंभिक समभाग विक्रीच्या माध्यमातून निधी उभारणीबाबत, भारतात दिसत असलेल्या चित्राच्या विपरीत निरुत्साह दिसून येत आहे. ‘ग्लोबलडेटा’ने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार, कॅलेंडर वर्ष २०२३ च्या पहिल्या आठ महिन्यांत जगभरात प्रारंभिक समभाग विक्रीच्या (आयपीओ) माध्यमातून निधी उभारणी ५२.२ टक्क्यांनी घसरून १४७.२ अब्ज डॉलर झाली आहे.