मुंबई : अब्जाधीश गौतम अदानी यांच्या समूहाने कंपन्यांचा ताळेबंद सुदृढ व निरोगी असल्याचा आणि कंपन्याच्या व्यवसायाला तसेच हाती घेतलेल्या नवीन प्रकल्पांना कोणतीही पुनर्वित्त जोखीम किंवा नजीकच्या मुदतीच्या रोख-तरलतेच्या चणचणीचा सामना करावा लागणार नाही, असा दावा केला.

समभागांमध्ये सुरू असलेली निरंतर पडझड आणि काही दिवसांच्या अवधीत बाजार मूल्यात निम्म्याहून अधिक नुकसान सोसलेल्या अदानी समूहाने मंगळवारी भांडवली बाजार मंचांना सादर केलेल्या बहुप्रतीक्षित पत-अहवालात धोक्याची कोणतीही चिन्हे नसल्याचा दावा केला. नजीकच्या कालावधीत मुदत संपत असलेली कोणतीही मोठी कर्जे नसल्याने रोख-तरलतेची समस्या निर्माण होणार नसल्याचेही अहवालात म्हटले आहे. विशेषत: अदानी समूहातील बाजारात सूचिबद्ध कंपन्यांकडे गुंतवणूकदारांनी पाठ करून सुरू केलेला विक्रीचा मारा शमवण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून हा अहवाल देण्यात आला. प्रत्यक्षात त्याचे सुपरिणाम बुधवारी बाजारातील व्यवहारात दिसून आले आणि अदानी समूहातील बहुतांश कंपन्यांच्या समभागातील पडझड थांबून, त्यांचे समभाग मूल्य वाढलेले दिसून आले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हिंडेनबर्ग रिसर्च या अमेरिकी संस्थेने हिशेबात घोटाळे, गैरव्यवहार, समभागांच्या किमती फुगवण्याची लबाडी केल्याचे २४ जानेवारीला केलेल्या आरोपानंतर, अदानी समूहातील सूचिबद्ध कंपन्यांचे बाजारमूल्य तीन आठवडय़ात १२,५०० कोटी अमेरिकी डॉलरहून जास्त कमी झाले आहे. बुधवारी मात्र समूहातील बहुतांश कंपन्यांचे समभाग तेजीत होते. समूहातील प्रमुख कंपनी अदानी एंटरप्रायझेस, अदानी पोर्ट्स, अदानी विल्मर, त्याचप्रमाणे एसीसी, अंबुजा सिमेंट्स आणि एनडीटीव्ही या सहा कंपन्यांचे समभाग मूल्य वधारले. त्या उलट अदानी टोटल गॅस, अदानी ट्रान्समिशन, अदानी ग्रीन एनर्जी आणि अदानी पॉवर या चार समभागांमध्ये खालचे सर्किट लागेपर्यंत घसरण दिसून आली.