वृत्तसंस्था, नवी दिल्ली : जागतिक पातळीवर मंदीसदृश परिस्थिती असल्याने गेल्या वर्षापासूनच तंत्रज्ञान क्षेत्रातील महाकाय कंपन्यांकडून नोकरकपात सुरू आहे, त्यातच आता गूगलने गेल्या वर्षीच्या तुलनेत पदोन्नती देण्यात देखील हात आखडता घेतला आहे.

कंपनी विद्यमान वर्षात ‘एल सिक्स’ आणि त्याहून पुढील श्रेणीतील कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीच्या संख्येत घट करणार आहे, असे गूगलने कर्मचाऱ्यांना ई-मेलच्या माध्यमातून कळविले आहे. गूगलमध्ये, ‘एल सिक्स’ श्रेणीतील कर्मचारी हे पहिल्या स्तरात मोडतात, म्हणजेच त्यांना वरिष्ठ मानले जाते. दहा वर्षांहून अधिक कामाचा अनुभव असलेल्या कर्मचाऱ्यांचा यात समावेश असतो.

पदोन्नती कमी करण्यामागील कारण ?

कंपनीने ‘गूगल रिव्ह्यू ॲण्ड डेव्हलपमेंट’ या नावाने नवीन कार्यप्रदर्शन पुनरावलोकन प्रणाली लागू केली आहे. ज्यामुळे कार्यक्षमतेअभावी कमी मानांकन मिळविणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या संख्येत देखील वाढ होणार आहे. शिवाय कमी कर्मचाऱ्यांना पदोन्नत करण्यात आल्यामुळे वरिष्ठ श्रेणीतील कर्मचारी संख्या देखील कमी झाली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जागतिक पातळीवरील वाढती अनिश्चितता आणि मंदीच्या परिस्थितीवर मात करण्यासाठी गूगलने खर्चकपातीचा निर्णय घेतला आहे. परिणामी नवीन वर्षात जानेवारीमध्ये १२,००० कर्मचाऱ्यांना कमी करण्याची घोषणा करण्यात आली होती. संभाव्य मंदीच्या भीतीने आणि आगामी काळात बाजारात टिकून राहण्यासाठी कंपन्यांकडून मोठ्या प्रमाणावर खर्चात कपात केली जात असल्याने २०२३ मध्ये दररोज सरासरी १६०० हून अधिक कर्मचाऱ्यांना नोकरीला मुकावे लागले असून, संपूर्ण वर्षभर हा क्रम सुरू राहण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी म्हणजेच २०२२ मध्ये दररोज सरासरी १००० कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्यात आले.