पीटीआय, नवी दिल्ली
दूरसंचार क्षेत्रातील आघाडीची कंपनी असलेल्या भारती एअरटेलचे अध्यक्ष सुनील मित्तल यांचे वेतनमान आर्थिक वर्ष २०२५ मध्ये किरकोळ वाढून ३२.५ कोटी रुपये झाले, तर उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक असलेल्या गोपाल विठ्ठल यांचे वेतन ९.१ टक्क्यांनी वाढले आहे, असे कंपनीच्या ताज्या वार्षिक अहवालाने स्पष्ट केले.
मित्तल यांच्या वेतनात २१.५७ कोटी रुपये वेतन आणि भत्ते, ७.५ कोटी रुपये कामगिरीशी संबंधित प्रोत्साहन, ३.४८ कोटी रुपये भत्ते यांचा समावेश आहे, जे सर्व मिळून त्यांना ३२.५ कोटी रुपये वेतन मिळते. ३२.५ कोटी रुपये असलेले मित्तल यांचे वेतन मागील आर्थिक वर्षापेक्षा ०.८८ टक्के अधिक आहे. तर आर्थिक वर्ष २०२५ मध्ये गोपाल विठ्ठल यांना २०.२४ कोटी रुपये वेतन मिळाले, जे आर्थिक वर्ष २०२४ पेक्षा सुमारे नऊ टक्के अधिक आहे. आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये त्यांना सुमारे १८.५० कोटी रुपये वेतन मिळाले होते. या वर्षात, मित्तल आणि विठ्ठल यांना मागील वर्ष २०२३-२४ साठी कामगिरीशी संबंधित प्रोत्साहन म्हणून अनुक्रमे १०.४ कोटी रुपये आणि १०.३ कोटी रुपये मिळाले.
एअरटेलची पर्प्लेक्सीटीसोबत भागीदारी
भारती एअरटेलने पर्प्लेक्सीटी भागीदारी करून ग्राहकांना मोफत एआय टूल उपलब्ध करून दिले आहे. याचा एअरटेलच्या सुमारे ३६ कोटी ग्राहकांना लाभ होणार आहे. पर्प्लेक्सीटी हे एआय टूल असून जे विद्यार्थीना स्वयं-शिक्षणासाठी, काम करणाऱ्या व्यवसायिकांसाठी किंवा गृहिणींसाठी फायदेशीर ठरणार आहे. यामाध्यमातून वापरकर्ते विविध माहिती शोधण्याचा, शिकण्याचा आणि तांत्रिकदृष्टया अधिक सक्षम होण्यास मदत होईल. पर्प्लेक्सीटीच्या या एआय टूलच्या सब्सक्रिप्शनची किंमत बाजरात १७,००० रुपयांना आहे. मात्र, एअरटेलने हे त्यांच्या ग्राहकांना (मोबाइल, वाय-फाय आणि डीटीएच) वर्षभरासाठी मोफत उपलब्ध करून दिले आहे. एअरटेल थँक्स ॲपवर लॉगिन करून एअरटेल वापरकर्त्यांना याचा लाभ घेता येणार आहे. एअरटेलच्या ग्राहकांसाठी अत्याधुनिक एआय क्षमता सादर करणाऱ्या पर्प्लेक्सीटीसोबत केलेली भागीदारी फायदेशीर ठरणार आहे. एअरटेलच्या लाखो वापरकर्त्यांना वास्तविक काळातील ज्ञान आणि माहिती सहज उपलब्ध होणार आहे आणि त्यासाठी कोणताही अतिरिक्त खर्च करावा लागणार नाही, असे भारती एअरटेलचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक गोपाल विठ्ठल म्हणाले.
शुक्रवारच्या सत्रात भारती एअरटेलचा समभाग १.५० टक्क्यांच्या घसरणीसह १,९०१ रुपयांवर बंद झाला. सध्याच्या शेअरच्या बाजारभावानुसार कंपनीचे सुमारे ११.०२ लाख कोटींचे बाजारभांडवल आहे.