देशातील अधिकाधिक छोट्या उत्पादक – व्यावसायिकांना अधिक सुलभतेने ॲमेझॉनच्या ई-कॉमर्स मंचावर दाखल होता यावे यासाठी नोंदणी प्रक्रियेचे सुलभीकरण करण्यासह, २०२५ पर्यंत एक कोटीच्या घरात सूक्ष्म व लघुउद्योजकांना या डिजिटल बाजार मंचावर सामावून घेण्याचे लक्ष्य असल्याचे ॲमेझॉन इंडियाने गुरुवारी स्पष्ट केले.

छोट्या व्यावसायिकांना सामावून घेण्याची ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आवश्यक ‘इन्टेलिजन्ट’ सूचना देण्याची अधिकची मदतही विक्रेत्यांना या मंचावर मिळणार आहे. ही नवीन आणि सुधारित प्रक्रिया वापरून विक्रेत्यांना ‘ॲमेझॉन डॉट इन’वर विनासायास नोंदणी करता येणार आहे आणि केवळ एका स्मार्टफोननिशी विक्रेता म्हणून प्रवास सुरू करता येईल. ॲमेझॉन इंडियाच्या सेलिंग पार्टनर सेवेचे संचालक अमित नंदा म्हणाले, सध्या ॲमेझॉन विक्रेत्यांपैकी ६५ टक्के हे मूळचे द्वितीय आणि तृतीय श्रेणीच्या शहरांतील आहेत आणि नव्याने दाखल विक्रेत्यांकडून हे प्रमाण निरंतर वाढतच आहे.

‘पॉलिसीबॉस’द्वारे गुंतवणूकदारांकडून निधी उभारणी

सर्वात वेगाने वाढणारी विमा क्षेत्रातील तंत्रज्ञानाधारित कंपनी ‘पॉलिसीबॉस’ने इंडिया एसएमई इन्व्हेस्टमेंट्स आणि माधव मिराणी (माजी सह-संस्थापक, आऊट) या गुंतवणूकदारांच्या गटाकडून निधी उभारणीची मालिका बी नुकतीच यशस्वीपणे पूर्ण केली. हा निधी तंत्रज्ञान कौशल्यात वाढीसाठी आणि देशभरात सल्लागार-आधारित वितरण जाळ्याला विस्तारण्यासाठी करणार असल्याचे कंपनीने स्पष्ट केले.

हेही वाचाः ‘मनरेगा’ वेतनासाठी आधारसक्षम देयक प्रणालीच्या सक्तीला मुदतवाढ

रिलायन्स निप्पॉन लाइफकडून ‘बोनस’रूपात ३४४ कोटींचे वाटप

रिलायन्स निप्पॉन लाइफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेडने आर्थिक वर्ष २०२२-२३ मधील आपल्या सहभागी योजनांतील पॉलिसीधारकांसाठी एकूण ३४४ कोटी रुपयांचा बोनस जाहीर केला आहे. कंपनीच्या ५.६ लाखांहून अधिक ग्राहकांना याच लाभ मिळेल. कंपनीने २०२२-२३ आर्थिक वर्षात १०८ कोटी रुपयांच्या करोत्तर नफ्याची कमाई करत (आधीच्या वर्षाच्या तुलनेत ६५ टक्के वाढ) दमदार आर्थिक कामगिरीची नोंद केली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हेही वाचाः मोठी बातमी ! भरती गैरव्यवहारप्रकरणी ‘टीसीएस’कडून सहा कर्मचाऱ्यांची हकालपट्टी