Amazon to replace 5 lakh human jobs with robots : कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे अनेकांची नोकरी जाण्याची भीती सतत व्यक्त केली जाते. यादरम्यान दिग्गज ई-कॉमर्स कंपनी अॅमेझॉनमध्ये लवकरच पाच लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांची जागा रोबोट्स घेण्याची शक्यता असल्याची बाब समोर आली आहे. न्यूयॉर्क टाइम्सने कंपनीच्या अंतर्गत कागदपत्रांच्या हवाल्याने यासंबंधीचे वृत्त दिले आहे. या रिपोर्टनुसार, कंपनीच्या रोबोटिक्स टीमचे उद्दीष्ट ७५ टक्के कामकाज हे ऑटोमेट करणे हे आहे, जेणेकरून वेअरहाऊसमध्ये शक्य तितकी कमी माणसे लागतील.
या रिपोर्टमध्ये दावा केला गेला आहे की ई-कॉमर्स कंपनी अॅमेझॉनच्या ऑटोमेशन टीमची अपेक्षा आहे की कंपनीला अमेरिकेत २०२७ पर्यंत भरती करणे आवश्यक असलेल्या आणखी १६०००० हून अधिक कर्मचार्यांना भरती करणे टाळता येईल. यामुळे अॅमेझॉनने पिकिंग, पॅकिंग आणि डिलिव्हरी केलेल्या प्रत्येक वस्तूमागे अंदाजे ३० सेंट्स किंवा २६ रुपये इतकी बचत होईल. अधिकार्यांनी सांगितले की, मालाची विक्री दुप्पट होणार असली तरी रोबोट ऑटोमेशनमुळे २०३३ पर्यंत ते ६००००० कर्मचार्यांना नोकरी देणे टाळता येईल. सध्या अॅमेझॉनमध्ये सुमारे १२ लाख कर्मचारी काम करतात. .
कंपनीत केल्या जाणाऱ्या या बदल आण त्यावर उमटणारी प्रतिक्रिया याचा विचार करत कंपनीने या कागदपत्रांमध्ये काही शब्द वापरणे टाळल्याचे समोर आले आहे. ‘ऑटोमेशन’ आणि ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ अशा शब्दांऐवजी प्रगत तंत्रज्ञान हा शब्द वापरण्यात आला आहे आणि रोबोट्स या ऐवजी कोबॉट्स (मानव आणि रॉबॉट्स यांच्यातील सहयोग) हा शब्द वापरण्यात आला आहे. इतकेच नाही तर अॅमेझॉनने सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये अधिक सहभाग नोंदवत “गुड कॉर्पोरेट सिटीझन” म्हणून आपली प्रतिमा निर्माण करण्याबाबतही विचार केल्याचे वृत्त न्यूयॉर्क टाइम्सने दिले आहे.
अॅमेझॉनच्या प्रवक्त्या केली नँटेल (Kelly Nantel) यांनी न्यूयॉर्क टाइम्सशी बोलताना सांगितले की, ही कागदपत्रे कंपनीतील एकाच गटाचा दृष्टिकोन दाखवतात तसेच त्यांनी अॅमेझॉनची सणांच्या हंगामात २५०००० लोकांना नोकरी देण्याची य़ोजना असल्याचेही त्यांनी नमूद केले. मात्र ही नोकर भरती करार आधारित असेल की कायमस्वरूपी याबद्दल कंपनीने भूमिका स्पष्ट केलेली नाही.
२०१२ साली अॅमेझॉनने रोबोटिक ऑटोमेशनसाठी मोठा निर्णय घेतला होता, जेव्हा त्यांनी किवा (Kiva) ही रोबोटिक्स कंपनी ७७५ दशलक्ष डॉलर्समध्ये खरेदी केली होती. गेल्या वर्षी कंपनीने त्यांचे सर्वात प्रगत वेअरहाऊस लॉन्च केले होते, ज्यामध्ये १००० रोबोट्स जवळपास कुठल्याही मानवी हस्तक्षेपाशीवाय पॅकेजवर प्रक्रिया करतात.