पीटीआय, नवी दिल्ली – रिलायन्स समूहाचे संस्थापक मुकेश अंबानी आणि अदानी समूहाचे सर्वेसर्वा गौतम अदानी यांनी परस्परांच्या इंधन विक्री व्यवसायाचा फायदा मिळविण्याच्या उद्देश एकत्र येत भागीदारी सुरू केली आहे. दोन अग्रणी अब्जाधीशांच्या उद्योग घराण्यांमधील ही दुसरी व्यावसायिक भागीदारी आहे.
या भागीदारीतून दोहोंकडून परस्परांच्या इंधन विक्री स्थळांचा वापर करून, एकंदर विस्तार वाढविणार आहेत. अंबानींचा ब्रिटनमधील बीपीच्या साथीने ‘जिओ-बीपी’ नावाने उपक्रम आहे ज्याद्वारे वाहनांसाठी पेट्रोल-डिझेल इंधनाची पंप देशभरात सुरू आहेत. तर अदानी समूहाने फ्रान्सच्या टोटल एनर्जीजसह अदानी टोटल गॅस लिमिटेड (एटीजीएल) या संयुक्त उपक्रमातून सीएनजी वितरण सुरू केले आहे. नव्या भागीदारीने एटीजीएलच्या सीएनजी पंपावर जिओ-बीपीला पेट्रोल आणि डिझेलची विक्री सुरू होईल, तर जिओ-बीपीच्या पंपांवर सीएनजीची विक्री अदानींकडून सुरू केली जाईल, असे बुधवारी दोन्ही कंपन्यांनी संयुक्त निवेदनातून स्पष्ट केले.
जिओ-बीपीकडे देशभरात १,९७२ पेट्रोल पंप आहेत, तर एटीजीएलने देशातील ३४ भौगोलिक क्षेत्रांमध्ये ६५० सीएनजी पंपाचे जाळे विस्तारले आहे. भागीदारीमुळे दोन्हींची विक्री केंद्रांचे जाळे साधारण २,६०० हून अधिक विस्तारणार आहे.
स्पर्धकच आता भागीदार
अलिकडच्या महिन्यांत दुसऱ्यांदा अंबानी आणि अदानी हे स्पर्धक उद्योगसमूह एकत्र आले आहेत. गेल्या वर्षी मार्चमध्ये, दोघांनी मध्य प्रदेशातील वीज प्रकल्पासाठी त्यांच्यातील पहिल्या सहकार्य करारावर स्वाक्षरी केली होती. रिलायन्सने मध्य प्रदेशातील अदानी पॉवरच्या प्रकल्पात २६ टक्के हिस्सा घेतला आणि प्रकल्पातील ५०० मेगावॅट वीज वापरासाठी करारावर स्वाक्षरी केली. गेल्या काही वर्षांपासून आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती या बहुमानासाठी दोहोंत स्पर्धाही सुरू आहे. अदानी मेगा रिन्यूएबल एनर्जी पार्क बांधत आहे आणि सौर मॉड्यूल आणि पवन टर्बाइन उत्पादनात त्यांनी पाऊल ठेवले आहे.
रिलायन्सदेखील गुजरातमधील जामनगर येथे सौर वीज पॅनेल, बॅटरी, ग्रीन हायड्रोजन आणि इंधन सेलसाठी प्रत्येकी एक अशा चार गिगाफॅक्टरी बांधत आहे. ५जी स्पेक्ट्रम एअरवेव्हच्या लिलावादरम्यानही दोघे एकमेकासमोर उभे ठाकले होते. अंबानी २०१४ पासून सीएनबीसी-टीव्ही१८, सीएनएन-न्यूज१८ सारख्या वृत्तवाहिन्यांसह आणि कलर्स सारख्या मनोरंजन वाहिन्यांद्वारे माध्यम क्षेत्रात कार्यरत असताना, अदानी यांनी या क्षेत्रात त्यांच्यापुढे आव्हान उभे केले आहे.