मुंबईः घसरत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर, अर्थव्यवस्थेसाठी ‘बूस्टर डोस’ ठरणारी रिझर्व्ह बँकेकडून व्याजदरात पाव टक्क्यांची आश्चर्यकारक कपातीची विश्लेषकांची अपेक्षा आहे. उद्या (बुधवारी) सकाळी १० वाजता गव्हर्नर संजय मल्होत्रा पतधोरण समितीच्या तीन दिवस सुरू राहिलेल्या मंथनातून पुढे आलेल्या निष्कर्षांची घोषणा करणे अपेक्षित आहे.
सार्वजनिक क्षेत्रातील दोन प्रमुख बँका युनियन बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ बडोदा यांनी रिझर्व्ह बँकेकडून २५ आधारबिंदू अर्थात पाव टक्के कपातीची भेट दसऱ्याच्या तोंडावर कर्जदारांना मिळेल, असे स्वतंत्रपणे प्रसिद्ध केलेल्या अहवालात म्हटले आहे.
युनियन बँकेच्या अहवालानुसार, महागाईत दिसून आलेल्या घसरणीमुळे कपातीच्या निर्णयाला वाव निर्माण केला आहे. ग्राहक मागणीला चालना देणारी अलिकडे झालेली वस्तू व सेवा करातील (जीएसटी) कपातीच्या जोडीला अर्थव्यवस्थेसाठी आणखी एक ‘बूस्टर’ म्हणून या कपातीकडे पाहिले जाईल, असे अहवालाने नमूद केले आहे. रिझर्व्ह बँकेचे हे पाऊल उद्योगजगत, ग्राहक आणि एकंदर बाजारातील उत्साही भावनांना बळ देण्याचे काम करू शकते. पतधोरण समितीच्या बैठकीअंती रिझर्व्ह बँक रेपो दर अपरिवर्तित ठेवण्याची अपेक्षा आहे, मात्र पाव टक्क्यांची कपात झाली तरी ते एक सकारात्मक आश्चर्य मानले जाईल, असे बँक ऑफ बडोदाच्या अर्थतज्ज्ञ सोनल बधान म्हणाल्या.
बधान यांच्या मते, जरी रिझर्व्ह बँकेने दर कपात करण्याचा निर्णय घेतला तरी, आर्थिक वर्ष २०२५-२६ साठीच्या अर्थव्यवस्था विकासदर (जीडीपी वाढ) अंदाजात कोणताही बदल होण्याची शक्यता नाही. कारण वास्तविक अर्थव्यवस्थेवर पतधोरणातील बदलांचा परिणाम दिसून येण्यासाठी साधारणपणे दोन ते तीन तिमाही लागत असतात. त्यामुळे भूमिकाही ‘तटस्थ’ स्थितीत अपरिवर्तित ठेवली जाण्याची शक्यता आहे, असे त्या म्हणाल्या.
वर्षाच्या सुरुवातीपासून रिझर्व्ह बँकेने १०० आधार बिंदू अर्थात पूर्ण एक टक्क्यांची व्याजदर कपात आधीच केली आहे आणि बधान यांच्या मते, या निर्णयाचा परिणाम हळूहळू अर्थव्यवस्थेत दिसून येत आहे. पुढे जाता, बाह्य ताणाचा रिझर्व्ह बँकेच्या धोरणात्मक निर्णयावर प्रभाव राहिल. अमेरिका अजूनही भारतासोबत व्यापार करारावर वाटाघाटी करत असल्याने, मध्यवर्ती बँक या वाटाघाटीतून पुढे येणाऱ्या तोडग्याची वाट पाहणे पसंत करू शकते.
या संबंधाने अधिक स्पष्टता येईपर्यंत ‘जैसे थे’ स्थिती राखली जाण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. व्याजदर कपात चक्रातील शेवटच्या काही कपातींची वेळ ठरविणे हे नेहमीच कठीण असते. तथापि, आता नाही झाली तरी येत्या डिसेंबर अखेरपर्यंत किमान आणखी पाव टक्के कपात अपेक्षित आहे, असे विश्लेषकांनी नमूद केले आहे.