पुणेः बहुराज्यात विस्तार असलेल्या कॉसमॉस सहकारी बँकेने सोमवारी पार पडलेल्या ११७ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत, सभासदांना ८ टक्के लाभांश वितरणाच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आणि आता रिझर्व्ह बँकेकडे या लाभांश वाटपाला परवानगीसाठी बँकेकडून अर्ज केला जाणार आहे.
शिवशंकर सभागृह, महर्षीनगर येथे झालेल्या सभेत, मुंबईस्थित दी सिटी को-ऑपरेटिव्ह बँकेच्या विलीनीकरण योजनेला सभासदांनी बहुमताने मान्यता दिली. या विलीनीकरणाला आता रिझर्व्ह बँकेच्या मान्यतेसाठी अर्ज केला जाईल, असे कॉसमॉस बँकेचे अध्यक्ष मिलिंद काळे यांनी सांगितले. सरलेल्या आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये कॉसमॉस बँकेने पुण्यातील शारदा सहकारी बँक तसेच मुंबईतील मराठा सहकारी बँक अशा दोन बँका त्यांच्या अनुक्रमे ८ व ७ शाखांसह विलीन करून घेण्याची प्रक्रिया पूर्ण केली आहे. परिणामी कॉसमॉस बँकेच्या एकूण संख्या १५९ वर पोहचली आहे. शिवाय मुंबईस्थित साहेबराव देशमुख सहकारी बँकेला विलीन करून घेण्यासाठी बँकेने सादर केलेला प्रस्ताव रिझर्व्ह बँकेच्या मंजुरीच्या प्रतीक्षेत असल्याचे काळे यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा – २०७५ पर्यंत भारत जगातील दुसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनू शकेल : गोल्डमन सॅक्स
सरलेल्या आर्थिक वर्षात बँकेच्या ठेवी १७,६२९ कोटींवर पोहोचल्या, तर बँकेने १३,११६ कोटींचे कर्जवितरण केले. बँकेचा एकंदर व्यवसाय ३०,७४५ कोटी रुपयांवर पोहोचला असून, या वर्षात बँकेने १५१.४१ कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला आहे.