नवी दिल्लीः आगामी सणासुदीच्या काळात वाहन खरेदी मोठ्या प्रमाणात केली जाते. मात्र, वस्तू व सेवा करातील (जीएसटी) नवीन टप्पे लागू केले जाणार असल्यामुळे वाहने स्वस्त होण्याची आशा निर्माण झाली आहे. या परिस्थितीत ग्राहकांकडून वाहन खरेदी लांबणीवर टाकली जाण्याची शक्यता आहे. हे टाळण्यासाठी कराचे नवीन टप्पे लवकर लागू करावेत, अशी मागणी फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डिलर्स असोसिएशन्स (एफएडीए) संघटनेने केंद्रीय वाणिज्य मंत्री पियूष गोयल यांच्याकडे केली आहे.

जीएसटी परिषदेची उच्चस्तरीय बैठक केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सातीरामन यांच्या अध्यक्षतेखाली ३ ते ४ सप्टेंबरला होत आहे. यात जीएसटीच्या दोन कर टप्प्यांवर चर्चा होणार आहे. त्यात जीएसटीचे दोन कर टप्पे होण्याची चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर ‘एफएडीए’ने केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पियूष गोयल यांना पत्र लिहिले आहे. जीएसटी परिषदेची बैठक मुदतीआधी घेऊन जीएसटीचे नवीन कर टप्पे जाहीर करावेत. हे कर टप्पे सणासुदीच्या काळाआधी लागू करावेत, अशी मागणी ‘एफएडीए’ने केली आहे.

‘एफएडीए’ने पत्रात म्हटले आहे की, जीएसटीचे दोन कर टप्पे करण्यात येणार असून, याबाबतच्या घोषणेमुळे वाहन वितरकांसाठी आव्हानात्मक स्थिती निर्माण झाली आहे. आगामी काळात ओणम, गणपती, नवरात्र आणि दिवाळी या सणांसाठी वितरकांनी वाहनांचा साठा करून ठेवलेला आहे. जीएसटीचे कर टप्पे कमी होणार असल्याने ग्राहकांकडून तोपर्यंत वाहन खरेदी लांबणीवर टाकली जाण्याची शक्यता आहे. याचबरोबर ग्राहकांकडून वाहनांच्या नवीन दरांची मागणी होऊ शकते. यातून आगामी सणासुदीच्या काळातील वाहन विक्रीवर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे. नवीन कर टप्पे लागू झाल्यानंतर केवळ दिवाळीपासूनच वाहन खरेदीत वाढ होऊ शकेल.

जीएसटीचे नवीन टप्पे आगामी सणासुदीच्या काळाआधी लागू करण्याची आवश्यकता आहे. यामुळे संपूर्ण सणासुदीच्या काळात वाहनांना मागणी राहील. ही मागणी केवळ दिवाळीच्या काळापुरती राहणार नाही. – फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डिलर्स असोसिएशन्स