लोकसत्ता व्यापार प्रतिनिधी
मुंबई : बजाज अलियान्झ जनरल इन्शुरन्स कंपनीने राज्यनिहाय स्वतंत्र विमा योजना सादर केल्या आहेत. प्रत्येक राज्यातील आरोग्याची वेगवेगळी स्थिती लक्षात घेऊन, त्याला साजेशी विमा योजनांची रचना करण्याचा हा अभिनव प्रयोग आहे.
प्रत्येक राज्यात आरोग्य सुविधांची गरज, उपचाराची उपलब्धता आणि वैद्यकीय खर्च यात खूप फरक आहे. याचा विचार करून बजाज अलियान्झने प्रत्येक राज्यासाठी स्वतंत्र विमा योजना तयार केल्या आहेत. त्यात स्थानिक रुग्णालयांचे जाळे, संबंधित राज्यातील आरोग्याचे प्रश्न आणि उपचाराचा खर्च यांचा विचार करण्यात आला आहे. त्यामुळे प्रत्येक राज्यातील आरोग्य सुविधांच्या परिस्थितीनुसार विम्याचा हप्ताही वेगवेगळा असणार आहे. सर्वांसाठी एकाच प्रकारची विमा योजना देण्याऐवजी प्रत्येक राज्यातील नागरिकांच्या आरोग्यविषयक गरजांनुसार वेगवेगळ्या विमा योजना सादर केल्या आहेत, अशी माहिती कंपनीने दिली.
विमाधारकांसाठी उपचारांची उपलब्धता आणि ते परवडणारे असावेत, हा प्रमुख निकष या योजनांमागे आहे. व्यक्तिगत विमाधारकासह कुटुंबांनाही याचा फायदा होणार आहे. या विमा योजनेत ५ ते २० लाख रुपयांचे विमा संरक्षण मिळेल. त्यात तरूण व्यावसायिकांपासून ज्येष्ठ नागरिकांचा समावेश असेल, असे कंपनीने स्पष्ट केले आहे.