पुणे : देशात कोणतेही कौशल्य नसल्याने रोजगार नसलेल्या तरुणांची संख्या मोठी आहे. त्यांना कौशल्य प्रशिक्षण देऊन त्यांचा रोजगारक्षम करण्याचे पाऊल बजाज समूहाने ‘बजाज बियॉण्ड’ या सामाजिक दायित्व (सीएसआर) उपक्रमांतर्गत उचलले असून, पुढील पाच वर्षांत त्यावर ५,००० कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.

हेही वाचा >>> रुपयाची गटांगळी

‘बजाज बियॉण्ड’च्या माध्यमातून हाती घेतले जाणाऱ्या सामाजिक उपक्रमांची माहिती बजाज कुटुंबातील सदस्यांनी शुक्रवारी येथे पत्रकार परिषदेत दिली. या प्रसंगी बजाज ऑटोचे अध्यक्ष नीरज बजाज, व्यवस्थापकीय संचालक राजीव बजाज, बजाज इलेक्ट्रिकल्सचे अध्यक्ष शेखर बजाज, मधुर बजाज आणि बजाज फिनसर्व्हचे अध्यक्ष संजीव बजाज आदी उपस्थित होते.

देशातील एकूण मनुष्यबळापैकी केवळ ५ टक्के कौशल्य-प्रशिक्षित आहे. त्यामुळे बजाज समूहाकडून पुढील पाच वर्षांत दोन कोटी तरूणांना कौशल्य प्रशिक्षण देऊन रोजगारक्षम बनविण्यात येणार आहे. या तरुणांना स्वयंउद्योजकतेच्या संधी मिळून ते भारतीय अर्थव्यवस्थेत योगदान देऊ शकतील. गेल्या १० वर्षांत बजाज समूहाने ‘सीएसआर’च्या माध्यमातून सुमारे ४ हजार कोटी रुपयांचा निधी खर्च केला आहे. शिक्षण, कौशल्य विकास, आरोग्य, जलसंवर्धन यासह इतर क्षेत्रात हा निधी खर्च झालेला आहे, असे नीरज बजाज यांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सीआयआय राहुल बजाज एक्सलन्स केंद्राची घोषणा

भारतीय उद्योग महासंघ अर्थात ‘सीआयआय’सोबत भागीदारी करून ‘सीआयआय राहुल बजाज एक्सलन्स ऑन स्कील्स’ या केंद्राची स्थापना पुण्यात करण्याची घोषणा यावेळी करण्यात आली. या समयी सीआयआयचे महासंचालक चंद्रजीत बॅनर्जी यांनी या केंद्राच्या स्थापनेबद्दल माहिती दिली. या केंद्राच्या माध्यमातून तरुणांना उत्पादन क्षेत्रासह विविध क्षेत्रांतील नवीन तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.