मुंबई : सार्वजनिक क्षेत्रातील आघाडीची बँक असलेल्या बँक ऑफ महाराष्ट्र अर्थात महाबँकेचा निव्वळ नफा सरलेल्या जून तिमाहीत २३ टक्क्यांनी वधारून १,५९३ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. मुख्यत: बुडीत कर्जांमध्ये झालेली घट आणि व्याज उत्पन्नातील वाढीमुळे बँकेने ही भरीव कामगिरी केली आहे.
पुणेस्थित मुख्यालय असलेल्या महाबँकेने मागील वर्षीच्या एप्रिल-जून तिमाहीत १,२९३ कोटी रुपयांचा निव्वळ नफा नोंदवला होता. सरलेल्या तिमाहीत एकूण उत्पन्न ७,८७९ कोटी रुपयांवर पोहोचले आहे, जे गेल्या वर्षीच्या याच कालावधीत ६,७६९ कोटी रुपयांवर होते, असे बँक ऑफ महाराष्ट्रने बाजार मंचाला दिलेल्या माहितीतून स्पष्ट केले.
बँकेचे व्याजापोटी उत्पन्न आर्थिक वर्ष २०२५ च्या जून तिमाहीत ५,८७५ कोटी रुपयांच्या तुलनेत ७,०५४ कोटी रुपयांवर पोहोचले आहे. तर एकूण बुडीत कर्ज (एनपीए) १.७४ टक्क्यांपर्यंत घसरल्याने बँकेच्या पत गुणवत्तेत सुधारणा दिसून आली. गेल्या वर्षी याच कालावधीत एकूण बुडीत कर्जाचे प्रमाण १.८५ टक्के राहिले होते. तसेच, निव्वळ बुडीत कर्ज गेल्या वर्षीच्या ०.२० टक्क्यांवरून कमी होऊन ०.१८ टक्क्यांवर मर्यादित आहे. बँकेचे भांडवली पर्याप्तता गुणोत्तर आर्थिक वर्ष २०२४-२५ च्या याच तिमाहीतील १७.०४ टक्क्यांवरून २०.०६ टक्क्यांपर्यंत वधारले आहे.
मंगळवारच्या सत्रात महाबँकेचा समभाग १.९४ टक्क्यांनी वधारून ५७.१७ रुपयांवर बंद झाला. सध्याच्या बाजारभावानुसार बँकेचे ४३,९७२ कोटी रुपयांचे बाजार भांडवल आहे.