पीटीआय, नवी दिल्ली: अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या प्रमुख आठ पायाभूत क्षेत्रांचा विकास गेल्या वर्षीच्या याच महिन्यातील ६.३ टक्क्यांवरून, यंदा सरलेल्या जुलै महिन्यात २ टक्क्यांपर्यंत मंदावला, असे बुधवारी जाहीर झालेल्या अधिकृत आकडेवारीने स्पष्ट केले. कोळसा, नैसर्गिक वायूचे उत्पादन कमालीचे घटल्याचा हा परिणाम आहे.
या आधीच्या म्हणजेच जून महिन्यात प्रमुख क्षेत्रांची वाढ २.२ टक्के नोंदवली गेली होती. औद्योगिक उत्पादन निर्देशांकात (आयआयपी) ४० टक्के योगदान असलेल्या आठ प्रमुख क्षेत्रांची कामगिरी मंदावली इतकेच नाही, तर निम्म्या उद्योग क्षेत्रांची कामगिरी जुलैमध्ये कमालीची निराशाजनक राहिली.
कोळसा, खनिज तेल, नैसर्गिक वायू आणि तेल शुद्धीकरण क्षेत्र या प्रमुख क्षेत्रांची वाढ लक्षणीय खुंटली असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या जुलैमध्ये त्यांच्या उत्पादनात मोठी घट झाली आहे. उल्लेखनीय म्हणजे चालू आर्थिक वर्षाच्या एप्रिल ते जुलै या चार महिन्यांमध्ये, आठ पायाभूत क्षेत्रांचा विस्तार अवघ्या १.६ टक्क्यांनी होऊ शकला, जो गेल्या वर्षीच्या याच कालावधीत ६.३ टक्क्यांपेक्षा अधिक होता.
कोळशाचे उत्पादन १२.३ टक्क्यांनी घटले, ही पाच वर्षांतील सर्वात मोठी घसरण आहे. तर खनिज तेलाचे उत्पादन सलग सातव्या महिन्यात आक्रसत, १.४ टक्क्यांनी कमी झाले. नैसर्गिक वायूचे उत्पादन ३.२ टक्क्यांनी घटले, तर तेल शुद्धीकरण क्षेत्राचे उत्पादन दोन महिन्यांच्या विस्तारानंतर पुन्हा घटले आहे.
मात्र दुसरीकडे पोलाद उत्पादनाने २१ महिन्यांतील सर्वात जलद १२.८ टक्क्यांची वाढ नोंदवली. सीमेंट उत्पादनाने ११.७ टक्क्यांनी वाढ साधून चार महिन्यांतील सर्वोच्च पातळी गाठली. वीज निर्मितीत ०.५ टक्क्यांनी वाढ झाली. तीन महिन्यांतील हा उच्चांक असण्यासह, ही वाढ या क्षेत्राला पुन्हा सकारात्मक क्षेत्रात आणणारी ठरली.