मुंबईः तंत्रज्ञानाधारित ऑनलाइन शिकवणी मंच बैजूजचे उपयोजन (मोबाईल ॲप) गूगल प्लेस्टोअरमधून हटविण्यात आले आहे. ॲमेझॉन वेब सर्व्हिसेसचे देयक थकविल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

वित्तीय व्यवस्थापनांत अनेक प्रकारच्या अनियमितता यामुळे देशी-परदेशी गुंतवणूकदारांनी बैजूजकडे पाठ फिरवत तिच्या आर्थिक संकटात भर घातली आहे. परिणामी कर्मचाऱ्यांना अनेक महिन्यांचे वेतनही कंपनीला देता आलेले नाही, तर लेखापरीक्षित वित्तीय कामगिरी जाहीर करण्याबाबत कंपनीची चालढकल सुरू आहे. या शिवाय न्यायालयीन कज्जांची मालिकाही तिच्यापुढे आहे.

वित्तीय व्यवस्थापनाचा बोजवारा आणि आर्थिक अडचणींचा सामना करत असलेल्या बैजूजपुढे यातून नवीन संकट उभे राहिले आहे. बैजूजच्या उपयोजनावर चौथी ते बारावीच्या वर्गांसाठी गणित, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र हे विषय शिकविले जातात. याचबरोबर सहावी ते आठवीचे सामाजिक शास्त्राचे वर्गही घेतले जातात. या उपयोजनावर जेईई, नीट आणि आयएएस या सारख्या प्रवेश परीक्षांच्या तयारीसाठी मार्गदर्शन केले जाते. बैजूजने अमेझॉन वेब सर्व्हिसेसचे देयक न दिल्याने गूगल प्लेस्टोअरमधूल हे उपयोजन हटविण्यात आले आहे. 

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्लेस्टोअरमधून हटविण्यात आले असले तरी बैजूजचे उपयोजन ॲपलच्या ॲप स्टोअरवर उपलब्ध आहे. तसेच, बैजूजच्या नावाने चालणाऱ्या थिंक अँड लर्नची उपयोजने अद्याप कार्यरत आहेत. याचबरोबर बैजूजचे प्रीमियम उपयोजन आणि परीक्षा तयारी उपयोजन गूगल प्लेस्टोअरवर उपलब्ध असतील.