नवी दिल्ली : बैजूज या ऑनलाइन शिकवणी मंचाची मालकी असलेल्या थिंक अँड लर्नने कर्मचाऱ्यांच्या मार्च महिन्याच्या वेतनाची आंशिक पूर्तता केली, अशी माहिती सूत्रांनी सोमवारी दिली. कंपनीचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी बैजू रवींद्रन यांनी यासाठी वैयक्तिक क्षमतेत उसनवारी केली असल्याचे स्पष्ट करण्यात आले.

शनिवारी २० एप्रिलला बैजूजच्या कर्मचाऱ्यांच्या खात्यात पगार जमा झाला. सूत्रांच्या माहितीनुसार, जमा झालेली रक्कम पगाराच्या ५० ते १०० टक्क्यांच्या दरम्यान आहे. या आंशिक वेतनपूर्ततेवर बैजूजने २५ ते ३० कोटी रुपयांच्या घरात खर्च केला असण्याचा अंदाज आहे. शिक्षक आणि निम्न स्तरातील कर्मचाऱ्यांना संपूर्ण वेतन अदा केले गेले आहे.

हेही वाचा >>> “भारत ७ टक्के विकासदर गाठेल, पण तो पुरेसा नाही कारण…”, RBI च्या चलनविषयक समितीच्या सदस्यांची ठाम भूमिका!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

महिन्याचा पगार देण्यासाठी रवींद्रन यांनी वैयक्तिक कर्ज उचलले आहे. हक्कभाग विक्रीतून उभारला गेलेला निधी अजूनही परदेशी गुंतवणूकदारांनी रोखून धरला आहे, असे सूत्रांनी सांगितले. कंपनीने कर्मचाऱ्यांचे वेतन आणि संबंधित खर्चासह परिचालनाच्या आवश्यकता पूर्ण करण्यासाठी हक्कभाग विक्रीतून २० कोटी अमेरिकी डॉलरचा निधी उभारला आहे.

प्रोसस, जनरल अटलांटिक, सोफिना आणि पीक एक्सव्ही – चार गुंतवणूकदारांच्या गटाने इतर प्रमुख भागधारकांच्या पाठबळासह संस्थापकांच्या विरोधात राष्ट्रीय कंपनी विधि न्यायाधिकरणाकडे (एनसीएलटी) दावा दाखल केला आहे. यातून कंपनीतील भागभांडवलाच्या रचनेत बदल होऊ शकतो, असा त्यांचा दावा आहे. याप्रकरणी एनसीएलटीपुढे मंगळवारी, २३ एप्रिलला सुनावणी होणार आहे. सुनावणीच्या एक दिवस आधीच वेतनपूर्ततेचे पाऊल कंपनीने टाकले आहे.