बीजिंग : भारतीय तपास यंत्रणांनी अटक केलेल्या स्मार्टफोन निर्मात्या ‘विवो’च्या दोन चिनी कर्मचाऱ्यांना वाणिज्य दूतावासामार्फत हस्तक्षेपाने संरक्षण आणि सहाय्य प्रदान केले जाईल, असे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने सोमवारी स्पष्ट केले. भारताकडून चिनी कंपन्यांशी भेदभाव होत असून, तो थांबवावा असे आवाहनही त्यांनी केले.
चिनी स्मार्टफोन निर्माता कंपनी विवोने भारतातील करदायित्व चुकवण्यासाठी चीनमध्ये बेकायदेशीररीत्या ६२,४७६ कोटी रुपये हस्तांतरित केल्याचे सक्तवसुली संचालनालय अर्थात ‘ईडी’कडून गतवर्षी जुलैमध्ये सांगण्यात आले. तेव्हापासून या बेकायदेशीर व्यवहारासंबंधाने ही यंत्रणा चौकशी करीत आहे. विवोमधील चिनी कर्मचारी आणि काही बनावट भारतीय कंपन्यांच्या माध्यमातून हा अपहार झाल्याचा ‘ईडी’चा दावा असून, दोन चिनी कर्मचाऱ्यांना गेल्या आठवड्यात याच कारणाने अटक करण्यात आली असल्याचे समजते. या दोघांना शनिवारी दिल्ली उच्च न्यायालयात आणण्यात आले आणि न्यायालयाने त्यांची ‘ईडी’च्या कोठडीत रवानगी केली, असे या प्रकरणाशी संबंधित व्यक्तीने वृत्तसंस्थेला सांगितले.
हेही वाचा >>> रिलायन्स अन् डिस्ने एकत्र येणार? देशातील सर्वात मोठ्या मनोरंजन कंपनीची कमान अंबानींच्या हाती असणार
तथापि भारतात नमूद केलेल्या नियम व गोष्टीचे कंपनीकडून काटेकोरपणे पालन होत आले आहे. तरी पक्षपाताने कारवाई होत असेल तर चिनी कंपन्यांचे कायदेशीर हक्क आणि हितसंबंध जपण्यासाठी चीनचे सरकार त्यांची खंबीरपणे पाठराखण करेल, असे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते माओ निंग यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत सांगितले. विवोच्या भारतातील उपकंपनीच्या या दोन वरिष्ठ कर्मचाऱ्यांच्या अटकेला, कंपनीने कायदेशीर आव्हान देण्यासाठी पाऊल टाकले आहे.
कथित आर्थिक गैरव्यवहाराच्या या प्रकरणात विवोच्या भारतीय उपकंपनीसाठी काम करणाऱ्या एका चिनी नागरिकासह, चार अधिकाऱ्यांना अटक केल्यानंतर दोन महिन्यांनी, आणखी दोघांना ताब्यात घेणारी ही कारवाई झाली आहे. कंपनीने तपास यंत्रणांच्या आरोपांना नाकारत कारवाई झालेल्या कर्मचाऱ्यांना पाठबळ दिले आहे.