नवी दिल्ली : विमानाचे इंधन म्हणून प्रचलित एव्हिएशन टर्बाइन फ्युएलमध्ये (एटीएफ) दर किलोलिटरमागे ३,९५४.३८ रुपयांनी म्हणजेच ४.४ टक्क्यांनी गुरुवारी कपात करण्यात आली. याबरोबरच वाणिज्य वापराच्या एलपीजीचे दर सिलिंडरमागे १४.५० रुपयांनी कमी करण्यात आले आहेत.
विमान इंधनाच्या दरात एका महिन्यातील ही दुसरी मोठी कपात आहे. याआधी १ एप्रिल रोजी ६.१५ टक्के म्हणजेच ५,८७०.५४ रुपये प्रति किलोलिटरची कपात करण्यात आली होती. आता ताज्या दर कपातीनंतर विमानाच्या इंधनाचे दर मुंबईमध्ये दर किलोलिटरमागे ८३,५७५.४२ रुपयांवरून ७९,८५५.५९ रुपयांपर्यंत, तर दिल्लीत आता हे दर किलोलिटरला ८५,४८६.८० रुपये झाले असल्याचे सरकारी तेल कंपन्यांनी स्पष्ट केले. विमान इंधनाचे दर कमी केल्याने विमान कंपन्यांचा भार हलका होण्यास मदत झाली आहे. विमान कंपन्यांचा परिचालन खर्चाच्या जवळपास ४० टक्के खर्च इंधनावर होतो.
तेल कंपन्यांनी वाणिज्य एलपीजीच्या किमतीत १४.५ रुपयांची कपात केल्याने १९ किलोग्रॅमच्या सिलिंडरची किंमत आता १,७४७.५० रुपये (दिल्ली) झाली आहे. मुंबईत वाणिज्य एलपीजीची किंमत आता प्रति सिलिंडर १,६९९ रुपये आहे. घरगुती वापराच्या स्वयंपाकाच्या गॅसचा दर मात्र ८५३ रुपये प्रति सिलिंडरवर कायम आहे.
गेल्या महिन्यात घरगुती एलपीजीच्या किमतीत प्रति सिलेंडर ५० रुपयांनी वाढ करण्यात आली होती. जागतिक व्यापार युद्धामुळे इंधन मागणी कमी झाल्यामुळे गेल्या काही आठवड्यात आंतरराष्ट्रीय पातळीवर तेलाच्या किमती कमी झाल्या आहेत. खनिज तेलाचे दर प्रतिपिंप सरासरी ६५ डॉलरवर व्यवहार करत आहेत. ही तीन वर्षांतील नीचांकी पातळी आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाच्या किमती कमी झाल्या असल्या तरी पेट्रोल आणि डिझेलचे देशांतर्गत दर स्थिर आहेत.