पुणे: सरलेल्या २०२३-२४ आर्थिक वर्षासाठी कॉसमॉस बँकेला सर्वोत्कृष्ट सहकारी बँकेचा पुरस्कार, केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. द महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशनची ४५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा आणि पुरस्कार वितरण सोहळा कॉसमॉस बँकेच्या मुख्यालयातील सहकार सभागृहात सोमवारी पार पडला.

हेही वाचा >>> वित्तीय तूट वार्षिक उद्दिष्टाच्या २७ टक्क्यांवर; एप्रिल ते ऑगस्टअखेरीस ४.३५ लाख कोटींवर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कॉसमॉस बँकेला हा पुरस्कार ५,००० कोटी रुपयांवरील ठेवी असलेल्या सहकारी बँकांच्या श्रेणीमध्ये प्राप्त झाला. बँकेतर्फे अध्यक्ष सीए मिलिंद काळे, उपाध्यक्ष सीए यशवंत कासार तसेच संचालक मंडळातील सदस्य आणि व्यवस्थापकीय संचालिका अपेक्षित ठिपसे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. लेखा परीक्षण वर्ग, ठेवी आणि कर्जांमधील वाढ, ढोबळ तसेच निव्वळ बुडीत कर्जे (एनपीए), भांडवल पर्याप्तता प्रमाण, कार्यात्मक व नक्त नफा अशा विविध निकषांवर अव्वल कामगिरीसह, कॉसमॉस बँकेने हा सर्वोत्कृष्टतेचा पुरस्कार पटकावला. देशाचे नवीन सहकार धोरण लवकरच जाहीर केले जाईल. त्यायोगे अर्थव्यवस्थेसाठी महत्त्वाचा कणा असलेल्या सहकारी बँकांचे प्रश्न व अडचणी निश्चितपणे सोडवल्या जातील, अशी ग्वाही यानिमित्ताने बोलताना मोहोळ यांनी दिली. या प्रसंगी व्यासपीठावर सहकार आयुक्त दीपक तावरे, फेडरेशनचे अध्यक्ष अजय ब्रह्मेचा, उपाध्यक्षा वैशाली आवाडे, रिझर्व्ह बँकेचे संचालक सतीश मराठे उपस्थित होते.