पीटीआय, नवी दिल्ली
अव्हेन्यू सुपरमार्ट्सचे (डीमार्ट) संस्थापक अब्जाधीश गुंतवणूकदार राधाकिशन दमानी यांनी आयवेअर रिटेलर लेन्सकार्ट सोल्युशन्समध्ये प्रारंभिक समभाग विक्री अर्थात आयपीओ-पूर्व टप्प्यात सुमारे ९० कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे, अशी माहिती शुक्रवारी सूत्रांनी दिली.

लेन्सकार्टची प्रारंभिक समभाग विक्री अर्थात आयपीओ येत्या आठवड्यात सुरू होण्याची शक्यता आहे, त्यापूर्वीच ही गुंतवणूक झाली आहे. भांडवली बाजार नियामक ‘सेबी’कडे सादर केलेल्या मसुदा प्रस्तावानुसार, प्रस्तावित आयपीओच्या माध्यमातून २,१५० कोटी रुपये उभारण्याचा लेन्सकार्टचा मानस आहे. या प्रक्रियेतून प्रवर्तक आणि विद्यमान गुंतवणूकदार देखील त्यांच्याकडील १३.२२ कोटी समभागांची विक्री करणार आहेत.

लेन्सकार्टने आयपीओच्या माध्यमातून मिळणारा निधी विविध धोरणात्मक उपक्रमांसाठी वापरण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. ज्यामध्ये भारतात कंपनी-संचालित आणि कंपनीच्या मालकीच्या नवीन दालनांची स्थापना करण्यासाठी भांडवली खर्च केला जाणार आहे. यासोबतच दालनांसाठी भाडेपट्टा, भाडे आणि परवाना करारांशी संबंधित देयके; तंत्रज्ञान आणि क्लाउड पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक; जागरूकता वाढविण्यासाठी खर्च केला जाणार आहे. २००८ मध्ये स्थापन झालेल्या लेन्सकार्टने २०१० मध्ये ऑनलाइन आयवेअर मंच म्हणून सुरुवात केली आणि २०१३ मध्ये नवी दिल्लीत त्यांचे पहिले दालन सुरू झाले.