मुंबई : सोने व्यवसायात काळानुसार अनेक स्थित्यंतरे आली. सुरुवातीला सोनाराकडून सोने खरेदी करण्यापासून ते आता डिजिटल स्वरूपात सोने खरेदी करता येते. सध्या बाजारात डिजिटल माध्यमातून देखील डिजिटल सोने खरेदी करता येते. यामुळे प्रतिग्रॅम सोने खरेदीवर १०,००० रुपये खर्च करण्यापेक्षा अगदी ५१ रुपयांत डिजिटल सोने खरेदीचे पर्याय अनेक कंपन्यांनी बाजारात उपलब्ध करून दिले आहेत.

डिजिटल पेमेंट पर्यायांद्वारे किंवा इंटरनेट बँकिंगच्या माध्यमातून शुद्ध सोने खरेदी करता येते. अगदी ५१ रुपयांपासून सोने खरेदी करता येते. “एमएमटीसी पॅम्प’ या देशातील एकमेव जागतिक दर्जाच्या रिफायनरीमध्ये तयार झालेले हे सोने शुद्धतेची १०० टक्के खात्री देते. हे सोने इलेक्ट्रॉनिक रूपामध्ये आपल्या खात्यात जमा होते. सोने प्रत्यक्षात हवे असल्यास ते देखील मागविता येते.

जगभरामध्ये गुंतवणुकीचे विविध प्रकार आहेत आणि त्या प्रकारांमध्ये सर्वात प्राचीन, सर्वात विश्वासार्ह आणि तात्काळ रोख उपलब्ध करून देणारा प्रकार म्हणजेच सोन्यामधील गुंतवणूक आहे. या गुंतवणूक प्रकाराविषयी सर्वात आधी जागृत असणारी संस्कृती म्हणजे भारतीय संस्कृतीआहे. अनादि काळापासून आपण धनसंचय कुठल्या प्रकारामध्ये करायचा तर तो केवळ सोन्यामध्ये अशी आपली परंपरा राहिली आहे. या परंपरेमुळेच जगभरामध्ये सर्वाधिक सोने कुणाकडे असेल तर ते भारतीयांकडे आहे.

डिजिटल गोल्ड पर्यायामुळे केवळ पन्नास रुपयांचे सुद्धा डिजिटल सोने खरेदी शक्य झाल्यामुळे महिन्याला हजार- पाचशे रुपयांचे सोने सुद्धा आपण खरेदी करू शकतो. ते डिजिटल स्वरूपात असल्याकारणाने प्रत्यक्षात सोने हाताळाण्याची गरज पडणार नाही. डिजिटल सोने डिमॅटमध्ये किंवा वॉलेटमध्ये जमा राहील, त्याचे मूल्य जरूर वाढेल शिवाय काही प्रकारांमध्ये त्यावर व्याज सुद्धा मिळू शकेल. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे हे सोने सांभाळण्याची गरज पडणार नाही, चोरी होणार नाही, किंवा हरवणार नाही. शिवाय जेव्हा हवे तेव्हा या डिजिटल सोन्याला विकता येणे शक्य होणार आहे.

बाजारात पेटीएम, फोनपे यांसारख्या डिजिटल देयकांच्या माध्यमातून डिजिटल गोल्ड खरेदी शक्य आहे. पेटीएमवर ५१ रुपयांपासून सोन्यात गुंतवणूक सुरू करता येते. गुंतवणूक रोज, आठवड्यातून किंवा मासिक पद्धतीनेही शक्य आहे. २४ कॅरेट सोने सुरक्षितरित्या खरेदी, साठवणूक आणि विक्री करता येते. शिवाय येत्या आपल्या जवळचया व्यक्तींना देखील डिजिटल गोल्ड भेट स्वरूपात देता येईल. फोनपेवर देखील १०० रुपयांपासून सोन्यात गुंतवणूक पर्याय उपलब्ध आहे.

पेटीएमने सणासुदीला आपल्या आप्तेष्टांना भेट म्हणून देण्यासाठी विविध पर्याय देखील उपलब्ध करून दिले आहेत. यात वैयक्तिक संदेशासह यूपीआय मनी ट्रान्सफर, गिफ्ट कार्ड्स, डिजिटल गोल्ड, प्रवासाची तिकीटे किंवा ट्रॅव्हल पास भेट, व्हेकेशन भेट आणि आरोग्य विमा यांचा देखील समावेश आहे.

वैयक्तिक संदेशासह यूपीआय अगदी काही सेकंदात शक्य आहे. अंतर कितीही असो पण भेटीचे मूल्य कायम राहते यूपीआयद्वारे सुरक्षित व विश्वसनीयरीत्या त्वरित पैसे हस्तांतरित करता येतात. याबरोबरच गिफ्ट कार्ड्स म्हणजे प्नामांकित ब्रँड्स, फॅशन रिटेलर्स, फूड चेन आणि विविध मनोरंजन मंचाचे पास देखील निवडण्याची मुभा आहे. यावरून डिजिटल ट्रॅव्हल व्हाउचर म्हणजे ट्रॅव्हल पास निवडता येतो, जो वेळेनुसार आणि इच्छेनुसार प्रवास करण्याची मुभा देतात. ट्रॅव्हल पासद्वारे १००० रुपयांपर्यंत सवलत मिळते आणि तो १ वर्षासाठी वैध असतो.

ऍपच्या माध्यमातून आरोग्य विमा देखील काढता येणे शक्य आहे. अगदी ४९९ रुपयांपासून मासिक प्रीमियममध्ये मॅटर्निटी कव्हर, हेल्थ चेकअप्स, डॉक्टर ऑन कॉल सेवा व इतर सुविधा मिळतात.

सोने खरेदीचे इतर पर्याय

‘गोल्ड एक्सचेंज ट्रेडेड फंड’(गोल्ड ईटीएफ)

‘गोल्ड ईटीएफ’ सोने खरेदीचा एक चांगला पर्याय आहे. म्हणजे सोन्याची युनिट रूपाने विक्री करणे. साधारणपणे एक ग्रॅम सोन्याच्या समतुल्य एक युनिट असते. हा पर्याय म्हणजे ‘पेपरगोल्ड’ म्हणजे युनिटच्या रूपामध्ये सोने खरेदी करणे. प्रत्यक्ष सोन्याऐवजी ‘डिमॅट’ खात्यात सोने नावावर जमा होते. प्रत्यक्ष सोने घरात बाळगण्याची जोखीम राहत नाही. अजून एक फायदा म्हणजे या युनिट्सचे शेअर बाजारात शेअरप्रमाणेच व्यवहार होतात. त्यामुळे या प्रकारच्या गुंतवणुकीमध्ये बऱ्यापैकी ‘लिक्विडिटी’ अर्थात रोखसुलभता असते.

गोल्ड म्युच्युअल फंड

सध्या अनेक म्युच्युअल फंड घराणे असा गुंतवणूक पर्याय उपलब्ध करून देतात. रेग्युलर आणि डायरेक्ट या दोन्ही प्रकारे इथे पैसे गुंतवता येतात. इतर म्युच्युअल फंडांच्या तुलनेत हे खूप छोटे आहेत. यांची मॅनेजमेंट फी ०.२ ते १.४ टक्का इतकी असते. शिवाय एक वर्षांच्या आत युनिट्स रिडीम करताना एक्झिट लोडसुद्धा लागतो. गोल्ड ईटीएफप्रमाणे ही गुंतवणूकसुद्धा आर्थिक पद्धतीची असून सोने हातात येत नाही. मात्र गोल्ड म्युच्युअल फंडातील गेल्या काही वर्षांवरील ‘एसआयपी’चे परतावे खूपच जास्त आहेत.