वस्तू आणि सेवा कराच्या रूपाने सरकारकडे जमा होत असलेल्या अप्रत्यक्ष करात महिनागणिक अपेक्षेपेक्षा सरस वाढ सुरू असताना, आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये डिसेंबरच्या मध्यापर्यंत प्रत्यक्ष करापोटी नक्त संकलन २०.६६ टक्के वाढले आहे. १७ डिसेंबर २०२३ पर्यंत परतावा वजा जाता प्रत्यक्ष कर म्हणून सरकारकडे १३,७०,३८८ कोटी रुपये जमा झाले. गतवर्षी याच काळात ११,३५,७५४ कोटी रुपयांचा प्रत्यक्ष कर महसूल जमा झाला होता. केंद्राकडे जमा १३,७०,३८८ कोटी रुपयांच्या प्रत्यक्ष कर महसुलात, कंपनी कराच्या रूपाने सर्वाधिक ६,९४,७९८ कोटी रुपये आणि वैयक्तिक प्राप्तिकरासह, रोखे उलाढाल कर (एसटीटी) या रूपात ६,७२,९६२ कोटी रुपये जमा झाले आहेत.

चालू आर्थिक वर्षात १७ डिसेंबरपर्यंत अग्रिम कराच्या रूपाने ६,२५,२४९ कोटी रुपये, उद्गम कर (टीडीएस) या रूपाने ७,७०,६०६ कोटी रुपये, स्व-मूल्याकंन कर म्हणून १,४८,६७७ कोटी रुपये, नियमित मूल्यांकन कर म्हणून ३६,६५१ कोटी रुपये आणि इतर किरकोळ वर्गवारीतून १४,४५५ कोटी रुपयांचा महसूल सरकारी तिजोरीत जमा झाला. अशा तऱ्हेने सकल कर-संकलन हे १५,९५,६३९ कोटी रुपयांवर गेले आहे, जे गतवर्षी याच कालावधीपर्यंत जमा १३,६३,६४९ कोटी रुपयांच्या संकलनाच्या तुलनेत १७.०१ टक्क्यांनी अधिक आहे. परताव्यापोटी (रिफंड) चालू आर्थिक वर्षात १७ डिसेंबरपर्यंत २,२५,२५१ कोटी रुपये करदात्यांना परत करण्यात आले. त्यामुळे नक्त कर संकलन १३,७०,३८८ कोटी रुपयांवर आले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

चालू आर्थिक वर्षात अग्रिम करापोटी डिसेंबरमध्यापर्यंत सरकारकडे ६,२५,२४९ कोटी रुपये जमा झाले आहेत, जे गेल्या वर्षी याच कालावधीपर्यंत जमा झालेल्या ५,२१,३०२ कोटी रुपयांच्या तुलनेत १९.९४ टक्क्यांनी अधिक आहे. अग्रिम करात कंपन्यांकडून जमा केल्या गेलेल्या कंपनी कराचा हिस्सा ४,८१,८४० कोटी रुपये इतका आहे, तर धनाढ्य व्यक्तींकडून जमा आगाऊ प्राप्तिकराचे प्रमाण १,४३,४०४ कोटी रुपयांचे आहे.