मुंबईः दुबईतील व्यापारउदीमांत आधीच भारतीयांचे स्थान अग्रस्थानी असताना, आणखी २०० देशी उद्योजकांशी व्यापार व गुंतवणूक भागीदारीच्या नवीन संधींची चाचपणी दिवसभरात करण्यात आली, असे दुबई चेंबर ऑफ कॉमर्सकडून मंगळवारी स्पष्ट करण्यात आले.

संयुक्त अरब अमिराती आणि भारतातील सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी कराराच्या (सीईपीए) तिसऱ्या वर्धापनदिनानिमित्त मंगळवारी मुंबईत दुबई-भारत व्यापार मंचाच्या परिषदेचे आयोजन करण्यात आले. यासाठी दुबईचे युवराज आणि संयुक्त अरब अमिरातीचे उपपंतप्रधान, संरक्षण मंत्री, तसेच दुबईच्या कार्यकारी परिषदेचे अध्यक्ष शेख हमदान बिन मोहम्मद बिन रशीद अल मकतूम जातीने उपस्थित होते.

संयुक्त अरब अमिरातीची आर्थिक राजधानी असलेले दुबई हे भारतीय कंपन्यांसाठी एक आकर्षक ठिकाण आहे, आजपर्यंत ७३,१०० कंपन्या दुबई चेंबर ऑफ कॉमर्सचे सक्रिय सदस्य म्हणून नोंदणीकृत आहेत. २०२४-२५ दरम्यान तब्बल ४,५०० हून अधिक नवीन भारतीय कंपन्या सामील झाल्या, जी वर्षागणिक १६.२ टक्क्यांची वाढ दर्शवते, असे त्या चेंबरचे उपाध्यक्ष अहमद बिन बायत यांनी नमूद केले. बायत यांच्या नेतृत्वात तेथील ३० वरिष्ठ उद्योगप्रमुखांचे शिष्टमंडळ भारतात आले असून, त्यांनी भारतातील व्यावसायिकांच्या भेटी घेऊन, संभाव्य भागीदारीसाठी चर्चा केल्या.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बायत म्हणाले की, हा नवगठित दुबई-भारत व्यापार मंच भारतीय आणि संयुक्त अरब अमिरातील कंपन्यांना भागीदारी व सहकार्याचे मार्ग शोधण्यास मदत करेल. विशेषतः दुबईत केला जाणारा व्यवसाय हा केवळ त्या शहरापुरता मर्यादित नसतो, तर त्याच्याशी जुळलेल्या बाह्य जगाशी होणारा हा व्यवसाय असतो, अशी त्यांनी पुस्ती जोडली.