लोकसत्ता व्यापार प्रतिनिधी

मुंबई : भांडवली बाजारातील तेजीमुळे नुकत्याच सरलेल्या आर्थिक वर्षात एक लाख कोटी रुपयांहून अधिक बाजार भांडवल असलेल्या कंपन्यांची संख्या ८० च्या पुढे पोहोचली आहे. जागतिक पातळीवर अनिश्चिततेचे वातावरण असूनदेखील देशांतर्गत आघाडीवर अर्थव्यवस्थेशी निगडित सकारात्मक घडामोडींमुळे बाजारात उत्साह कायम असून प्रमुख निर्देशांकांनी ऐतिहासिक विक्रमी पातळी गाठली आहे.

आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये एक लाख कोटी रुपयांहून अधिक बाजार भांडवल असलेल्या कंपन्यांची संख्या ४८ वर मर्यादित होती. आर्थिक वर्ष २०२१-२२ आणि २०२२-२३ मध्ये लाख कोटी मूल्याच्या कंपन्यांच्या संख्येत फारशी वाढ झालेली नाही. आर्थिक वर्ष २०२०-२१ मध्ये अशा कंपन्यांची संख्या ३६ होती. तर त्याआधीच्या म्हणजे २०१९-२० मध्ये केवळ १९ कंपन्यांचे बाजार भांडवल एक लाख कोटींहून अधिक होते. मात्र करोनाच्या महासाथीमुळे त्यांच्या मूल्यात मोठ्या प्रमाणात घट झाली.

हेही वाचा >>>भारत फोर्जच्या उपाध्यक्षपदी अमित कल्याणींची पुनर्नियुक्ती

सरलेल्या आर्थिक वर्षात (एप्रिल २०२३ – मार्च २०२४) मध्ये झायडस लाइफसायन्सेस, टीव्हीएस मोटर्स, टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट्स, कॅनरा बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, युनियन बँक आणि इतर कंपन्यांनी १ लाख कोटी बाजार भांडवलाचा टप्पा ओलांडला. सर्वश्रेष्ठ अब्जाधीश मुकेश अंबानी यांची रिलायन्स इंडस्ट्रीज २०.१५ लाख कोटी बाजार मूल्यासह देशातील सर्वात मौल्यवान कंपनी आहे, त्यानंतर टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस १४.५ लाख कोटी रुपये, एचडीएफसी बँक ११ लाख कोटी रुपये, आयसीआयसीआय बँकेचे ७.७ लाख कोटी रुपये बाजार भांडवल आहे. विद्यमान आर्थिक वर्षात तेजीची दौड कायम राहिल्यास आणखी काही कंपन्या या एक लाख कोटी रुपये मूल्याच्या गटात सामील होतील.