मुंबई: देशातील प्लास्टिक उद्योगाची बाजारपेठ २०२५ मधील २.३० लाख कोटी रुपयांवरून (२६.६१ अब्ज अमेरिकी डॉलर), २०३० पर्यंत ३.९० लाख कोटी रुपये (४४.५९ अब्ज डॉलर) अशी वाढेल साधेल, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. ई-कॉमर्स, पायाभूत सुविधा प्रकल्प, वाहन क्षेत्र हे मागणीचे सर्वात मोठे स्रोत असतील.

मोठ्या परिवर्तनांतून जात असलेल्या या उद्योगाचा वार्षिक चक्रवाढ वृद्धीदर १०.८८ टक्के राहण्याचा तज्ज्ञांचा अंदाज असून, यात निर्यात व्यवसायाने महत्त्वाची भूमिका बजावणे अपेक्षित आहे. प्लास्टिक वस्तूंची निर्यात ही २०२४-२५ मधील १२.५ अब्ज अमेरिकन डॉलरवरून, २०२७ पर्यंत दुप्पट म्हणजेच तब्बल २५ अब्ज अमेरिकी डॉलरवर पोहोचण्याची शक्यता त्यांनी वर्तविली आहे.

प्लास्टिकशी संबंधित देशातील प्रमुख संघटना, महासंघ आणि संस्थांची शिखर संस्था असलेल्या ‘प्लास्टइंडिया फाउंडेशन’ने अलीकडे शाश्वततेच्या अंगाला धरून प्लास्टिकच्या स्वीकारार्हतेसंबंधी जागृतीसाठी मोहिम सुरू केली आहे. मोहिमेच्या उद्घाटनानिमित्त फाउंडेशनचे अध्यक्ष रवीश कामथ यांनी या उद्योग क्षेत्राच्या आगामी वाढीवर भाष्य केले. मुख्यत्वे मोठ्या प्रमाणावर राबविण्यात येणाऱ्या पायाभूत सुविधा प्रकल्पांमुळे तसेच पॅकेजिंग, वाहन उद्योग, बांधकाम आणि इलेक्ट्रॉनिक्स अशा क्षेत्रांतील ग्राहक मागणीत झालेल्या वेगवान वाढ ही या क्षेत्रातील संधीला खुणावणारी असल्याचे ते म्हणाले.

ई-कॉमर्सच्या विस्तारामुळे गती मिळालेल्या पॅकेजिंग क्षेत्राची प्लास्टिकच्या बाजारपेठेत सध्या ४२ टक्के इतकी मजबूत हिस्सेदारी आहे. मुंबईचा समावेश असलेला पश्चिम भारत हा या उपभोगाचे प्रमुख केंद्र राहिले आहे. ज्याला गुजरात आणि महाराष्ट्रमध्ये केंद्रीत पेट्रोकेमिकल उद्योगातून महत्वपूर्ण प्रोत्साहन मिळत आहे, असे कामथ म्हणाले.

या उद्योगाची मजबुती दर्शवणारा निर्यात हा एक महत्वाचा निर्देशक आहे. भारताची प्लास्टिक निर्यात २०२५ च्या सुरुवातीस अंदाजे १०.३४ अब्ज अमेरिकन डॉलर्सपर्यंत पोहोचली आहे, ज्यामध्ये प्लास्टिक फिल्म्स, औद्योगिक घटक आणि विशेष पॉलिमर यांसह तयार उत्पादनांच्या विस्तृत श्रेणीचा समावेश आहे. जागतिक पातळीवरील मजबूत मागणी तसेच आपल्या उत्पादन क्षमतेला ही बाब अधोरेखित करते, असे कामथ यांनी स्पष्ट केले.

प्लास्टइंडिया २०२६ची राष्ट्रीय कार्यकारी समितीचे अध्यक्ष आलोक टिबरेवाला म्हणाले, “भारतीय प्लास्टिक उद्योग पायाभूत सुविधा, निवासी आणि डिजिटल क्षेत्रातील वेगवान विकासामुळे एका महत्त्वपूर्ण परिवर्तनाच्या टप्प्यातून जात आहे. जसे-जसे अर्थव्यवस्था विस्तारत आहे आणि डिजिटल इंडियासारख्या उपक्रमांना गती मिळत आहे, तसतसे प्लास्टिकचे अवकाश, अर्धसंवाहक (सेमीकंडक्टर) आणि संरक्षण क्षेत्रात योगदान वाढत जाणे अपेक्षित आहे. फेब्रुवारी २०२६ मध्ये दिल्ली येथे आयोजित होणारे प्लास्टइंडिया २०२६ या जागतिक मान्यता असलेल्या प्रदर्शन व मेळ्यांतून प्लास्टिक उत्पादनात अग्रगण्य म्हणून भारताच्या क्षमता आणि उत्तुंग उद्दिष्टांचे सादरीकरण केले जाणार आहे.