वृत्तसंस्था, फ्रँकफर्ट

जगाला वेड लावणारे आभासी चलन अर्थात क्रिप्टोकरन्सी या मालमत्ता प्रकारात युरोपीय मध्यवर्ती बँकेच्या (ईसीबी) अध्यक्षा ख्रिस्तिन लगार्ड यांच्या पुत्रालाही पछाडले आणि यातून त्याने त्याची जवळपास सगळी गुंतवणूक मत्ता गमावली, वारंवार सावधगिरीचा इशारा देऊनही हे घडले, अशी खुद्द लगार्ड यांनीच कबुली दिली.

लगार्ड यांनी सुरूवातीपासूनच क्रिप्टो चलनाच्या विरोधात उघड भूमिका घेतली आहे. हे आभासी डिजिटल चलन जोखीमपूर्ण, बिनकामाचे आणि गुन्हेगारांकडून बेकायदा कृत्यासाठी वापर होणारे आहे, असे त्यांचे मत आहे. आता त्यांनी त्यांच्या पुत्राचे यात हात पोळले असल्याचे जाहीर केले आहे. त्या म्हणाल्या, ‘मी मुलाला सावधगिरीचा इशारा दिला होता मात्र, त्याने ऐकले नाही. त्याने आभासी चलनात गुंतविलेली जवळपास सगळी रक्कम गमावली. ही रक्कम फार मोठी नव्हती. परंतु, त्याच्या एकूण मालमत्तेपैकी ६० टक्के होती. मी नंतर त्याच्याशी संवाद साधला त्यावेळी त्याने माझी भूमिका बरोबर होती, असेही मान्य केले.’

लगार्ड यांना तिशीतील दोन मुले आहेत. त्यापैकी नेमक्या कोणत्या मुलाने आभासी चलनात पैसे गमावले हे त्यांनी स्पष्ट केले नाही. युरोपीय मध्यवर्ती बँकेने आभासी चलनावर जागतिक नियंत्रण आणण्याची जाहीर भूमिका घेतली आहे. आभासी चलनाचे धोके माहिती नसलेल्या ग्राहकांचे संरक्षण करायला हवे, असे बँकेचे म्हणणे आहे. आभासी चलनातील कच्चे दुवे वापरून दहशतवाद्यांना आर्थिक रसद मिळत आहे आणि गुन्हेगार करचुकवेगिरी करीत आहेत, त्यामुळे त्यावर नियंत्रण आणावे, अशीही बँकेची भूमिका आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तुमचे क्रिप्टो चलनाबाबत काहीही मत असू शकते. लोकांना त्यांचे पैसे कुठेही गुंतविण्याचे स्वातंत्र्य आहे. मात्र, लोकांना गुन्हेगारांकडून सुरू असलेला व्यापार आणि व्यवसायात सहभागी होण्याचे स्वातंत्र्य नाही. – ख्रिस्तिन लगार्ड, अध्यक्षा, युरोपीय मध्यवर्ती बँक