पीटीआय, नवी दिल्ली
सरलेल्या सप्टेंबर महिन्यात विद्युत शक्तीवर चालणाऱ्या वाहनांची अर्थात ‘ईव्ही’ विक्री दुपटीने वाढली आहे. सप्टेंबर महिन्यात एकूण ‘ईव्ही’ प्रवासी वाहनांची विक्री १५,३२९ वर पोहोचली असून, मागील वर्षी याच महिन्यात ६,१९१ वाहनांची विक्री झाली होती.
टाटा मोटर्सने ६,२१६ ‘ईव्हीं’ची नोंदणी करून या श्रेणीत आघाडी घेतली आहे. सप्टेंबर २०२४ मध्ये विकल्या गेलेल्या ३,८३३ ‘ईव्हीं’च्या तुलनेत त्यात ६२ टक्क्यांनी वाढ झाली आहे. जेएसडब्ल्यू एमजी मोटरने गेल्या महिन्यात ३,९१२ ‘ईव्हीं’ वितरकांना रवाना केल्या, ज्याचे प्रमाण मागील वर्षी याच कालावधीत १,०२१ ‘ईव्हीं’च्या तुलनेत तिप्पट आहे. महिंद्र अँड महिंद्र यांनी सप्टेंबरमध्ये ३,२४३ विद्युत शक्तीवर चालणाऱ्या वाहनांची विक्री केली, मागील वर्षी याच कालावधीत त्यांची विक्री ४७५ इतकी होती.
यानंतर बीवायडी इंडियाचा क्रमांक लागतो, ज्यामध्ये ५४७ ‘ईव्हीं’चा समावेश आहे. किआ इंडियाने ५०६, ह्युंदाई मोटर इंडियाने ३४९, बीएमडब्ल्यू इंडियाने ३१० आणि मर्सिडीज-बेंझ इंडियाने ९७ ‘ईव्हीं’ची विक्री सप्टेंबरमध्ये केली आहे. याशिवाय, नवागत टेस्ला इंडियानेही गेल्या महिन्यात ६४ ‘ईव्हीं’ची विक्री केली.
दुचाकी विक्रीला वेग
सप्टेंबरमध्ये १,०४,२२० ई-दुचाकींची विक्री झाली आहे, जी गेल्या वर्षीच्या ९०,५४९ दुचाकी विक्रीच्या तुलनेत १५ टक्क्यांनी अधिक आहे. या विभागात, टीव्हीएस मोटरने सर्वाधिक २२,५०९ दुचाकींची विक्री केली. गेल्या वर्षी याच कालावधीत त्यांनी १८,२५६ दुचाकींची विक्री केली होती. बजाज ऑटो आणि एथर एनर्जीने गेल्या महिन्यात अनुक्रमे १९,५८० आणि १८,१४१ दुचाकींची विक्री करत दुसरे आणि तिसरे स्थान पटकावले. ओला इलेक्ट्रिक १३,३८३ दुचाकींच्या विक्रीसह चौथ्या स्थानावर राहिली, त्यानंतर हिरो मोटोकॉर्पने सप्टेंबरमध्ये १२,७५३ दुचाकींची नोंदणी मिळवली.