fEPFO launches face authentication for UAN generation : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (EPFO) सदस्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. आता अशा कर्मचार्यांना युनिव्हर्सल अकाउंट नंबर (यूएएन) तयार करण्यासाठी आणि संबंधित इतर सुविधांचा लाभ घेण्यासाठी फेस ऑथेंटिकेशनचा वापर करता येणार आहे. आता फक्त चेहरा दाखवून या सेवांचा लाभ घेता येणार असल्याने एकंदरीत प्रक्रिया सोपी आणि सोईस्कर होणार आहे.
ही सुविधा ईपीएफओच्या सेवांचा लाभ घेणे आणि प्रक्रिया सोपी करण्यासाठी राबवण्यात येत असलेल्या ‘ईपीएफओ २.०’ या मोहिमेचा भाग आहे. कंपन्या आणि कर्मचारी हे दोघेही आता सरकारचे यूएमएएनजी (UMANG) अॅप वापरून अगदी सहजपणे यूएएन जनरेट करू शकतात.
यामुळे वैयक्तिक माहिती चुकीची भरली जाणे किंवा मोबाईल नंबर देणे राहून जाणे, अशा समस्या संपून जाणार आहेत. पूर्वी अशा चुका झाल्यामुळे युएएन क्रमांक तयार करण्यासाठी खूप वेळ जात असे.
कोणत्याही संपर्काशिवाय आणि अत्यंत सुरक्षित सुविधेचा कोट्यवधी ईपीएफओ सदस्यांना लाभ होणार असून कर्मचारी कोणत्याही त्रासाशिवाय या पूर्णपणे डिजीटल सेवेचा अनुभव घेऊ शकणार आहेत, अशी माहिती पीआयबीने ९ एप्रिल २०२५ रोजी जारी केलेल्या परिपत्रकात दिली आहे.
आत्तापर्यंत यूएनए क्रमाक हे लोकांना कामावर ठेवणार्या कंपनीकडून कर्मचार्यांची माहिती ईपीएफओला देऊन तयार केले जात होते. मात्र या प्रक्रियेमध्ये अनेकदा चुका होत असत. जसे की फोन क्रमांक किंवा इतर माहिती चुकीची भरली जात असे, ज्यामुळे कर्मचार्यांना सेवांचा लाभ घेताना अडचणींचा सामना करावा लागत असे.
फेस ऑथेंटिकेशन वापरून केलेले बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन हे डेमोग्राफिक किंवा ओटीपी वापरून केलेल्या पारंपारिक पद्धतीच्या ऑथेंटिकेशनपेक्षा अधिक सुरक्षित असणार आहे, तसचे ईपीएफओ सीस्टममध्ये प्रवेश करतानाच अत्यंत अचूक आणि कुठलीही छेडछाड होऊ शकणार नाही अशा पद्धतीने ओळख पडताळणी केली जाईल, अशी माहितीही पीआयबीच्या परिपत्रकात देण्यात आली आहे.
२०२४-२५ या आर्थिक वर्षात ईपीएफओने १.२७ कोटी यूएएन जारी केले आहेत. परंतु त्यापैकी फक्त ३५ टक्केच (४४.६ लाख) सदस्यांनी प्रत्यक्षात ते सक्रिय केले आहे. या पार्श्वभूमिवर आता ही नवीन फेस ऑथेंटिकेशन प्रक्रिया सोपी असल्याने ही संख्या वाढविण्यास मदत होण्याची शक्यता आहे.