पीटीआय, नवी दिल्ली

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना अर्थात ईपीएफओच्या देशातील सुमारे सहा कोटी सदस्य कर्मचाऱ्यांसाठी ‘एटीएम’मधून त्यांच्या भविष्यनिर्वाह निधी म्हणजेच पीएफ खात्यातून विनाविलंब दाव्याचे पैसे रोख स्वरूपात मिळविता येण्याची सुविधा प्रस्तावित केली आहे. बँकिंग प्रणालीशी बरोबरी साधणारी ही सुविधा लवकरच खुली करण्याचा प्रयत्न असल्याचे केंद्रीय कामगार सचिव सुमिता डावरा यांनी शुक्रवारी स्पष्ट केले.

नवीन सुविधा सुरू करण्यासाठी तंत्रज्ञानासंबंधित पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्यात येत आहेत. यातून सभासदांचे पीएफसंबंधी दावे लवकर निकाली निघतील. नवीन बदल पुढील वर्षांपासून अमलात येणार आहेत. एटीएममध्ये वापरात येईल असे समर्पित डेबिट कार्ड सदस्यांना दिले जाईल. यामुळे दावेदार, लाभार्थींना दाव्याची रक्कम ‘एटीएम’मधून विनाविलंब काढता येईल. कर्मचारी भविष्यनिर्वाह निधी (ईपीएफ) खात्यातील कमाल ५० टक्के मर्यादेपर्यंत रक्कम काढण्याची मुभा असेल. तसेच मृत सदस्यांच्या नामनिर्देशित वारसांना ईपीएफओद्वारे चालवल्या जाणाऱ्या एम्प्लॉइज डिपॉझिट लिंक्ड इन्शुरन्स योजनेअंतर्गत कमाल ७ लाख रुपये दिले जातात. अशा प्रकारे, मृत ईपीएफओ सदस्यांच्या वारसालादेखील दाव्याची रक्कम काढण्यासाठी एटीएमचा वापर करता येईल.

हेही वाचा >>>स्विच मोबिलिटीकडून ‘लो फ्लोअर’ प्रकारात दोन सिटी बस

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सध्या पीएफ खात्यातून पैसे काढण्यासाठी सात ते १० दिवस लागतात. आणि ते खातेदाराच्या संलग्न बँक खात्यात जमा होता. त्यासाठी आवश्यक कागदी व्यवहारांचे सोपस्कार आणि प्रक्रिया ‘ईपीएफओ’ कार्यालयात जाऊन पूर्ण करावी लागते. पैसे काढण्यासाठी योग्य ते कारणही सदस्याला द्यावे लागते. तसेच ईपीएफओच्या ई-सेवा संकेतस्थळावरून कर्मचारी सदस्य त्यांच्या पीएफ खात्यातील रक्कम ऑनलाइनदेखील काढू शकतात.