पीटीआय, नवी दिल्ली
देशांत विद्युत शक्तीवर (ईव्ही) चालणाऱ्या वाहनांना वाढती मागणी असून, सरलेल्या जून महिन्यात त्यांची विक्री २८.६० टक्क्यांनी वाढून १.८० लाखांवर पोहोचली, अशी माहिती फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डीलर्स असोसिएशन अर्थात ‘फाडा’ने मंगळवारी दिली.
विद्युत शक्तीवर चालणाऱ्या वाहनांशी (ईव्ही) संबंधित नवोपक्रमात वाढलेली गुंतवणूक आणि केंद्र सरकारच्या ‘पीएम ई-ड्राइव्ह’ योजनेने विक्रीत वाढीला मदत केली आहे, असे ‘फाडा’चे अध्यक्ष सीएस विघ्नेश्वर म्हणाले. तीन चाकी ईव्हींच्या विक्रीतील वाढ ६० टक्क्यांहून अधिक आहे. याबरोबरच वाणिज्य वापराच्या ईव्हींची विक्री देखील वाढत आहे. देशात ई-व्ही चार्जिंग पायाभूत सुविधांचा विस्तार होत आहे, ज्यामुळे एकूण ईव्ही परिसंस्था बळकट होत आहे.
प्रवासी ईव्हींची वाढती विक्री आणि दुचाकी, तीनचाकी आणि वाणिज्य ईव्हींच्या विक्रीमध्ये लक्षणीय वाढ झाल्याने जून महिन्यात १.८० लाख ‘ईव्ही’ वाहनांची विक्री झाली. ‘ईव्ही’ प्रवासी वाहनांची विक्री जवळजवळ दुप्पट झाली असून, जून २०२४ मधील ७,३२३ वाहनांच्या तुलनेत विक्री ७९.९५ टक्क्यांनी वाढून १३,१७८ वाहनांवर पोहोचली आहे, असे फाडाची आकडेवारी स्पष्ट करते. या विभागाचा वाटा आता एकूण ‘ईव्ही’ विक्रीमध्ये ४.४ टक्के आहे, जो गेल्या वर्षी २.५ टक्क्यांवरून वाढला आहे.
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांची विक्री वार्षिक आधारावर ३१.६९ टक्क्यांनी वाढून १,०५,३५५ दुचाकींवर पोहोचली आहे, जी जून २०२४ मध्ये ८०,००३ दुचाकी होती. एकूण दुचाकी विक्रीत त्यांचा वाटा देखील ७.३ टक्क्यांपर्यंत वाढला आहे, जो गेल्या वर्षी ५.८ टक्के होता.
तीनचाकी वाहनांचा वाटा मोठा
इलेक्ट्रिक तीनचाकी वाहनांनी ‘ईव्ही’ बाजारातील आघाडीचा वाटा कायम ठेवला आहे. ६०,५५९ तीन चाकी ईव्ही जूनमध्ये विकल्या गेल्या, ज्यात वार्षिक आधारावर १५.७९ टक्के वाढ झाली आहे. एकूण ईव्ही विक्रीतील त्यांचा वाटा जून २०२४ मधील ५५.४ टक्क्यांवरून ६०.२ टक्क्यांपर्यंत वाढला. कारण ग्रामीण आणि एकूण शहरी दळणवळणामध्ये वाणिज्य तीन चाकी ईव्हींची भूमिका वाढत आहे. दरम्यान, ईव्ही वाणिज्य वाहन विभाग, लहान असला तरी, १२२.५ टक्के असा त्याने सर्वाधिक वाढीचा दर जूनमध्ये नोंदविला आणि विक्री १,१४६ वाहनांवर पोहोचली आहे. गेल्यावर्षी म्हणजेच जून २०२४ मध्ये ती ५१५ वाहने अशी होती.