scorecardresearch

फर्स्ट सिटिझन्स बँकेकडून दिवाळखोर सिलिकॉन व्हॅली बँकेचे संपादन

एसव्हीबीची मालमत्ता १० मार्चला १६७ अब्ज डॉलर होती आणि बँकेकडे ११९ अब्ज डॉलरच्या ठेवी होत्या. आता या बँकेची ७२ अब्ज डॉलरची अनुत्पादित कर्जे (एनपीए) फर्स्ट सिटिझन्सने १६.५ अब्ज डॉलरच्या सवलतीत अधिग्रहित केली आहेत.

first citizens bank, silicon valley bank
फर्स्ट सिटिझन्स बँकेकडून दिवाळखोर सिलिकॉन व्हॅली बँकेचे संपादन ( Photo – Reuters )

वृत्तसंस्था, न्यूयॉर्क

अमेरिकेतील बुडालेली सिलिकॉन व्हॅली बँक (एसव्हीबी) आता फर्स्ट सिटिझन्स बँक अँड ट्रस्ट कंपनीने ताब्यात घेतली आहे. तेथील ठेव विमा महामंडळ अर्थात ‘फेडरल डिपॉझिट इन्शुरन्स कॉर्पोरेशन’कडून दिवाळखोर बँकेच्या सर्व ठेवी आणि कर्जे ही फर्स्ट सिटिझन्स बँकेकडे वर्ग केला जात असल्याची घोषणा करण्यात आली.

चालू महिन्याच्या सुरुवातीला मुख्यत: तंत्रज्ञान क्षेत्राला वित्तपुरवठा करणाऱ्या सिलिकॉन व्हॅली बँकेच्या कोसळण्याने संपूर्ण जगाला हादरा देण्यासह, बँकिंग जगतावर संकटाची मालिकेचीच सुरुवात केली होती. युरोप-अमेरिकेतील बँकिंग जगताला गमावलेला आत्मविश्वास कमावण्यासाठी फर्स्ट सिटिझन्स बँकेबरोबर विलीनीकरणाचा हा करार उपकारक ठरेल, अशी नियामक यंत्रणांची भावना आहे.

फर्स्ट सिटिझन्स बँकेबरोबरच्या करारामुळे एसव्हीबीचे ठेवीदार आता आपोआप त्या बँकेचे ठेवीदार बनणार आहेत. त्यांच्या ठेवींना ठरावीक मर्यादेपर्यंत विमा संरक्षण असणार आहे. फर्स्ट सिटिझन्स बँकेकडे १०९ अब्ज डॉलरची मालमत्ता असून, ८९.४ अब्ज डॉलरच्या ठेवी आहेत. रोख तरलतेसाठी ‘एफडीआयसी’कडून बँकेला कर्जही दिले जाणार आहे.

एसव्हीबीची मालमत्ता १० मार्चला १६७ अब्ज डॉलर होती आणि बँकेकडे ११९ अब्ज डॉलरच्या ठेवी होत्या. आता या बँकेची ७२ अब्ज डॉलरची अनुत्पादित कर्जे (एनपीए) फर्स्ट सिटिझन्सने १६.५ अब्ज डॉलरच्या सवलतीत अधिग्रहित केली आहेत. एसव्हीबीकडील ९० अब्ज डॉलरचे रोखे आणि इतर मालमत्ता ‘एफडीआयसी’च्या ताब्यात राहणार आहेत. याचबरोबर फर्स्ट सिटिझन्स बँकेत ‘एफडीआयसी’ला भागभांडवली हिस्साही मिळाला आहे.

न्यू यॉर्क कम्युनिटी बँकेने एका आठवड्यापूर्वी २७० कोटी डॉलरच्या मोबदल्यात, अमेरिकेतील एसव्हीबीपाठोपाठ कोसळलेली दुसरी बँक अर्थात ‘सिग्नेचर बँके’चा महत्त्वपूर्ण भागभांडवली हिस्सा खरेदी करण्यास सहमती दर्शविली आहे. परंतु एसव्हीबीसाठी खरेदीदार शोधण्यात नियामकांना जास्त वेळ लागला.

एसव्हीबी बुडाल्यामुळे ठेव विमा निधीला (डीआयएफ) सुमारे २० अब्ज डॉलरचा फटका बसला आहे, असे ‘एफडीआयसी’ने म्हटले आहे. या मंडळाकडून मागील दोन आठवड्यांपासून सिलिकॉन व्हॅली बँकेसोबत, तिची उपकंपनी एसव्हीबी प्रायव्हेटची विक्री करण्याचा प्रयत्न सुरू होता. परंतु, आता एसव्हीबी प्रायव्हेटची स्वतंत्रपणे विक्री करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 28-03-2023 at 11:21 IST

संबंधित बातम्या