पुणे : फोर्स मोटर्स लिमिटेड कंपनीने सर्व प्रकारच्या वाहन श्रेणींवर सुधारित किमतीची घोषणा केली आहे. यात ट्रॅव्हलर, ट्रॅक्स, अर्बनिया, मोनोबस आणि गुरखा यांचा समावेश आहे. या सुधारित किमती २२ सप्टेंबरपासून लागू होतील. सणासुदीचा काळ सुरू होत असताना कंपनी ग्राहकांना सुधारित १८ टक्के वस्तू व सेवा कराचे (जीएसटी) संपूर्ण फायदे देणार आहे.
याबाबत फोर्स मोटर्स लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक प्रसन फिरोदिया म्हणाले की, प्रस्तावित जीएसटी दर कपात वाहन उद्योगामधील महत्त्वपूर्ण सुधारणा आहे. फोर्स मोटर्सच्या वतीने आम्ही २८ टक्क्यांवरून १८ टक्क्यांपर्यंत जीएसटी दर कपातीचे स्वागत करतो. सामूहिक प्रवासाचे साधन असलेल्या ट्रॅव्हलर, अर्बनिया व ट्रॅक्स यांना ग्राहकांची अधिक पसंती मिळेल. यातून सुरक्षित व अधिक विश्वसनीय सार्वजनिक परिवहन व्यवस्था सक्षम करतील. तसेच रूग्णवाहिकांना देखील या कपातीमधून फायदा होईल.
सरकारने वाहननिर्मिती क्षेत्रावरील उपकर काढून टाकला असून, हे योग्य दिशेने टाकलेले पाऊल आहे. त्यामुळे जीएसटी कराचे एकूण प्रमाण कमी होण्यास मदत होईल. या बदलामुळे या क्षेत्रातील मागणी आणखी वाढेल आणि सणासुदीच्या काळात खरेदीला गती मिळेल अशी अपेक्षा आहे. फोर्स गुरखालाही या जीएसटी दर कपातीचा फायदा होईल. याव्यतिरिक्त, इंजिन, सुटे भाग यावरील कमी दर पुरवठा साखळी मजबूत करतील आणि सरकारच्या मेक-इन-इंडिया मोहिमेला गती देतील, असे फिरोदिया यांनी नमूद केले.
वाहन – किमतीत कपात (रूपयांत)
ट्रॅव्हलर १.१८ लाख रूपये ते ४.५२ लाख रूपये
ट्रॅक्स २.५४ लाख रूपये ते ३.२१ लाख रूपये
मोनोबस २.२५ लाख रूपये ते २.६६ लाख रूपये
अर्बनिया २.४७ लाख रूपये ते ६.८१ लाख रूपये
गुरखा ९२.९ हजार रूपये ते १.२५ लाख रूपये