नवी दिल्ली : देशातील थेट परकीय गुंतवणुकीत (एफडीआय) घट होत असली तरी पुढील काळात परदेशी कंपन्या भारतात प्रकल्पांच्या उभारणीसाठी गुंतवणूक करतील अशी चिन्हे आहेत. विशेष म्हणजे, चीनच्या थेट परकीय गुंतवणुकीत तिमाही घट झालेली असताना भारतासाठी सकारात्मक चित्र दिसत आहे.
हेही वाचा >>> मोदी सरकारकडून सर्व राज्यांकरिता नोव्हेंबर २०२३ साठी ७२,९६१.२१ कोटी रुपयांचं वाटप
परदेशी कंपन्यांकडून प्रकल्प उभारणीसाठी पसंती असलेल्या देशांमध्ये संयुक्त राष्ट्रांच्या व्यापार व विकास परिषदेने भारताला आघाडीच्या तीन देशांमध्ये स्थान दिले आहे. जागतिक पातळीवरून नवीन गुंतवणूक आकर्षित करण्यात भारत यशस्वी ठरत आहे. भारतातील निव्वळ थेट परकीय गुंतवणूक एप्रिल ते ऑगस्ट या कालावधीत घटून २.९९ अब्ज डॉलरवर आली. मागील वर्षी याच तिमाहीत ती १८.०३ अब्ज डॉलर होती. रिझर्व्ह बँकेच्या ऑक्टोबरमधील आकडेवारीनुसार, या वर्षी देशातील थेट परकीय गुंतवणूक ७.२८ अब्ज डॉलर आहे. मागील वर्षी याच कालावधीत ती २२.७९ अब्ज डॉलर होती.
हेही वाचा >>> ‘सेन्सेक्स’ला ६५ हजारांची हुलकावणी
थेट परकीय गुंतवणुकीला आकर्षित करण्याचे प्रयत्न सरकारकडून होत आहेत. चीनवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी अनेक देश पावले उचलत आहेत. त्यामुळे २०२४ पर्यंत थेट परकीय गुंतवणुकीत वाढ होईल, अशी अपेक्षा आहे. आंतरराष्ट्रीय उत्पादन केंद्र व व्यापारी जाळे म्हणून भारत स्वत:ची ओळख बनवत आहे. त्याचाही सकारात्मक परिणाम दिसून येईल, असा अंदाज आहे.
पहिल्यांदाच चीनमधील एफडीआय नकारात्मक
चीनमधील थेट परकीय गुंतवणूक १९९८ नंतर पहिल्यांदाच नकारात्मक पातळीवर घसरली आहे. चीनमधील थेट परकीय गुंतवणूक तिसऱ्या तिमाहीत ११.८ अब्ज डॉलरने घटली आहे. चीनमधील थेट परकीय गुंतवणूक १०० अब्ज डॉलरवरून नकारात्मक पातळीवर घसरणे ही मोठी बाब असल्याचे विश्लेषकांचे म्हणणे आहे.