मुंबई: जेन स्ट्रीट शेअर घोटाळा हा भांडवली बाजार नियामकांच्या निष्क्रियतेतून घडला म्हणणे दुर्दैवी आहे, असे या प्रकरणावर ‘सेबी’च्या माजी अध्यक्षा माधवी पुरी बुच यांनी मंगळवारी पहिल्यांदाच भाष्य केले. एप्रिल २०२४ मध्येच नियामकांनी जेन स्ट्रीटची चौकशी सुरू केली होती, असेही त्यांनी नमूद केले.
जेन स्ट्रीट प्रकरणात तथ्यांकडे दुर्लक्ष, देखरेखीत हयगयीचा आरोप होत असून, माध्यमांमधून याला नियामकांचे अपयश ठरविणारे ‘खोटे कथानक’ पसरविले जात असल्याचा आरोप बुच यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केला. मार्च २०२५ मध्ये अध्यक्षपदाचा कार्यकाळ संपल्याने बुच पायउतार झाल्या आहे. तथापि त्या अध्यक्षपदी असताना ‘सेबी’ने एप्रिल २०२४ मध्येच या प्रकरणी तपास सुरू केला होता. नियामकाने त्यानंतर अनेकांगी पावले उचलली. एप्रिल २०२४ ते फेब्रुवारी २०२५ दरम्यान काही विशिष्ट पद्धतीने होणारे समभाग खरेदी-विक्रीचे व्यवहार थांबवण्यासाठी जेन स्ट्रीटला इशारा देणारे पत्र देखील दिले होते, असे त्या म्हणाल्या.
ऑक्टोबर २०२४ मध्येही ‘सेबी’ने धोरणात्मक हस्तक्षेप सुरू केला आणि अखेर फेब्रुवारी २०२५ मध्ये ‘सेबी’ने राष्ट्रीय शेअर बाजार अर्थात ‘एनएसई’ला जेन स्ट्रीटशी निगडित व्यवहारांवर बंदी घालण्याचे निर्देश दिले. या वर्षी मे महिन्यांत जेन स्ट्रीटने बाजारात बेकायदेशीररित्या फेरफारातून नफा मिळवण्यासाठी व्यवहार पुन्हा सुरू केले, ज्यामुळे शेवटी ‘सेबी’कडून बाजारातून त्यांच्या हकालपट्टीचे आदेश ३ जुलैला देण्यात आले.
बाजार निरीक्षकांच्या मते, नियामकाला एखाद्या घटनेचा तपास पूर्ण करण्यासाठी सहसा एक वर्षापेक्षा जास्त वेळ लागतो. गेल्या गुरुवारी (३ जुलै) ‘सेबी’ने दिलेल्या अंतरिम आदेशात, न्यूयॉर्कस्थित जेन स्ट्रीटला रोख आणि फ्युचर्स व ऑप्शन्स बाजारात एकाच वेळी व्यवहार करून निर्देशांकांमध्ये फेरफार केल्याबद्दल दोषी ठरविले आहे. शिवाय बाजारातील कथित समभाग व्यापार आणि किंमत फेरफाराच्या कृष्णकृत्यांतून समूहाने कमावलेला ४,८४३ कोटी रुपयांचा बेकायदेशीर नफा जप्त करण्याचे निर्देश दिले. जानेवारी २०२३ ते मे २०२५ या कालावधीत जेएस समूहाने ३६,६७१ कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला आहे.
व्यवहार बंदीला जेन स्ट्रीटकडून आव्हान
‘सेबी’ने लादलेल्या व्यवहार बंदीच्या आदेशाला आव्हान देणार असल्याचे अमेरिकेतील जेन स्ट्रीट (जेएस) समूहाकडून मंगळवारी सूचित करण्यात आले. जेएस समूहाने तिच्या भारतातील संस्थेचा, जेएसआय इन्व्हेस्टमेंट्स प्रा, लि.चा वापर रोख (कॅश) बाजारात मोठ्या प्रमाणात त्याच दिवशी खरेदी आणि विक्रीचा व्यवहार पार पाडण्यासाठी केला. अशा व्यवहार क्रिया आणि रणनीती परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी (एफपीआय) प्रतिबंधित आहेत आणि त्यामुळे त्या बेकायदेशीर ठरवण्यात आल्या. मात्र जेन स्ट्रीटच्या मते, असे व्यवहार हे ‘बेसिक इंडेक्स आर्बिट्राज ट्रेडिंग’च्या पद्धतींचा भाग असून, त्यांना बेकायदेशीर ठरवणे चुकीचे आहे. ‘सेबी’कडून करण्यात आलेल्या आरोपांमुळे निराश झालो असल्याचे जेएस समूहाच्या कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात आले.