पीटीआय, नवी दिल्ली

जिओब्लॅकरॉक म्युच्युअल फंड घराण्याने पहिल्या न्यू फंड ऑफर अर्थात ‘एनएफओ’च्या माध्यमातून १७,८०० कोटी रुपयांची गुंतवणूक प्राप्त केली आहे. जिओब्लॅकरॉक ओव्हरनाइट फंड, जिओब्लॅकरॉक लिक्विड फंड आणि जिओब्लॅकरॉक मनी मार्केट फंड या तीन फंडांच्या माध्यमातून निधी उभारणी झाली आहे.

गेल्या महिन्यात ३० जून ते २ जुलैदरम्यान सादर करण्यात आलेल्या ‘एनएफओ’मध्ये ९० हून अधिक संस्थात्मक गुंतवणूकदारांनी गुंतवणूक केली, जी विदा-आधारित गुंतवणूक आणि डिजिटल-प्रथम दृष्टिकोन असणाऱ्या जिओब्लॅकरॉक ॲसेट मॅनेजमेंटच्या मूल्यावर विश्वास दर्शवते, असे फंड हाऊसने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. कंपनीने त्यापैकी पहिला एनएफओ बंद करण्याची सोमवारी घोषणा केली. सुमारे ६७,००० पेक्षा अधिक वैयक्तिक गुंतवणूकदारांनी ‘एनएफओ’मध्ये गुंतवणूक केली.

देशातील ‘कॅश/डेट’ फंड क्षेत्रातील हा आतापर्यंतचा सर्वात मोठा ‘एनएफओ’ ठरला असून, यामुळे जिओब्लॅकरॉक देशातील ४७ म्युच्युअल फंड घराण्यांपैकी आघाडीच्या १५ संपत्ती व्यवस्थापन घराण्यांमध्ये स्थान मिळवण्यात यशस्वी ठरली आहे, असे नवागत जिओब्लॅकरॉक ॲसेट मॅनेजमेंटचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सीड स्वामिनाथन म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड आणि अमेरिकेतील महाकाय वित्तीय समूह असलेला ब्लॅकरॉक यांच्या ५०-५० टक्के भागीदारीतून जिओ ब्लॅकरॉक ॲसेट मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेडची स्थापन करण्यात आली आहे. म्युच्युअल फंडातील गुंतवणूक अधिक सुलभ आणि परवडणारी बनवून, भारतात गुंतवणुकीचे परिदृश्य बदलण्याचे जिओ ब्लॅरॉकचे ध्येय आहे. कंपनीला २६ मे २०२५ रोजी, म्युच्युअल फंड व्यवसायाचे कामकाज सुरू करण्यासाठी ‘सेबी’ने हिरवा कंदील दिला होता.