सॅनफ्रान्सिस्को : तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांमधील कपातीचे वारे कायम असून, या क्षेत्रातील आघाडीच्या गूगलने गैरवर्तनचा ठपका ठेवून ५० कर्मचाऱ्यांची कपात केल्यानंतर, आता पुनर्रचनेच्या नावाखाली काही प्रमुख व्यवसाय संघातील कर्मचाऱ्यांच्या कपातीचे पाऊल तिने उचलले आहे. नव्याने किती कर्मचाऱ्यांची गच्छंती केली जाईल, या संख्येचा मात्र गूगलने उलगडा केलेला नाही.

गूगलने पायथन, डार्ट, फ्लटर आणि इतर प्रमुख व्यवसाय विभागातील कर्मचाऱ्यांच्या कपातीचे नियोजन आखले आहे. यासाठी कंपनीच्या व्यवस्थापनाने पुनर्रचनेचे कारण दिले आहे. नेमकी किती कर्मचाऱ्यांची कपात केली जाणार हे मात्र जाहीर करण्यात आलेले नाही. प्रोगॅमिंग लँग्वेजशी निगडित कर्मचाऱ्यांची प्रामुख्याने कपात केली जात आहे. कपात करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना कंपनीत अथवा कंपनीबाहेर संधी मिळवून देण्यासाठी मदत केली जाईल असे सांगण्यात येत आहे. कंपनीने २०२३ मध्ये १२ हजार कर्मचाऱ्यांची कपात केली होती, तर २०२४ च्या पहिल्या चार महिन्यांत शेकडो कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखविला आहे.

हेही वाचा…निफ्टी’ची ऐतिहासिक उच्चांकी झेप, मात्र नफावसुलीने सत्राअंती घसरण! ‘सेन्सेक्स’ही ७५ हजाराला स्पर्श करून माघारी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याबाबत गूगलचे प्रवक्ते ॲलेक्स गार्सिया-कुमर्ट म्हणाले की, कंपनीच्या प्राधान्यक्रमावर असलेल्या गोष्टीत गुंतवणूक केली जात आहे. पुढील संधींचा विचार करून कंपनी पावले उचलत आहे. आम्ही अनेक विभागातील मनुष्यबळाची पुनर्रचना केली आहे. यामागे कार्यक्षमता वाढविण्याचा उद्देश असून, उत्पादकता वाढविण्यावरही भर दिला जात आहे. गूगलकडून संघ रचनेत सुटसुटीतपणा आणला जात आहे. कर्मचाऱ्यांना अधिक नाविन्यपूर्ण काम करण्याची संधी दिली जात आहे. कंपनीतील नोकरशाही आणि कर्मचाऱ्यांचे विविध स्तर कमी करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.