२०२४ मध्ये लोकांचे २२,८४५ कोटींपेक्षा जास्त नुकसान

नवी दिल्ली : सायबर गुन्हेगारांमुळे नागरिकांचे २२,८४५.७३ कोटी रुपयांपेक्षा जास्त नुकसान सरलेल्या २०२४ सालात झाले, जे त्या आधीच्या वर्षाच्या तुलनेत सुमारे २०६ टक्क्यांनी वाढले आहे, अशी माहिती मंगळवारी लोकसभेत सरकारकडून देण्यात आली.

केंद्रीय गृह मंत्रालयाच्या ‘इंडियन सायबर क्राइम कोऑर्डिनेशन सेंटर’ अर्थात ‘आय४सी’ विभागाद्वारे चालवल्या जाणाऱ्या राष्ट्रीय सायबर गुन्हे नोंद संकेतस्थळ आणि नागरिक वित्तीय सायबर फसवणूक नोंद व व्यवस्थापन प्रणालीनुसार, सरलेल्या २०२४ मध्ये संपूर्ण देशात सायबर फसवणुकीमुळे नागरिकांचे एकूण नुकसान २२,८४५.७३ कोटी रुपये होते, असे गृह राज्यमंत्री बंदी संजय कुमार यांनी एका लेखी प्रश्नाच्या उत्तरादाखल सांगितले. २०२३ मध्ये सायबर गुन्ह्यांतून नुकसानीचे प्रमाण ७,४६५.१८ कोटी रुपये होते, जे यंदा तिपटीहून अधिक वाढले आहे.

कुमार म्हणाले की, २०२४ मध्ये सायबर गुन्हेगारांनी केलेल्या आर्थिक फसवणुकीच्या ३६,३७,२८८ घटनांची नोंद वर दिलेल्या ठिकाणांवर झाली, तर मागील वर्षी अशा घटनांचे प्रमाण २४,४२,९७८ होते. त्यांनी दिलेल्या आकडेवारीनुसार, २०२२ मध्ये संकेतस्थळावर १०,२९,०२६ सायबर गुन्ह्यांची नोंद झाली, ज्यात वार्षिक तुलनेत १२७.४४ टक्के वाढ दिसून आली. २०२३ मध्ये १५,९६,४९३ घटना नोंदवल्या गेल्या, ज्यांनी वार्षिक तुलनेत ५५.१५ टक्के वाढ दर्शविली. तर २०२४ मध्ये २२,६८,३४६ प्रकरणे नोंदवली गेली, जी वार्षिक तुलनेत ४२.०८ टक्के वाढ दर्शवितात.

आर्थिक फसवणुकीची तात्काळ तक्रार करण्यासाठी आणि फसवणूक करणाऱ्यांकडून फसवणूक केलेल्या निधीची विल्हेवाट थांबवण्यासाठी ‘आय४सी’च्या नागरिक वित्तीय सायबर फसवणूक नोंद व व्यवस्थापन प्रणालीअंतर्गत फसगतीच्या प्रकरणे नोंदविण्यास २०२१ मध्ये सुरुवात झाली, असे ते म्हणाले. त्यावर आतापर्यंत १७.८२ लाखांहून अधिक तक्रारी नोंदविल्या गेल्या आणि ५,४८९ कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम वाचविता आली असल्याचे त्यांनी नमूद केले.

बँका/वित्तीय संस्थांच्या सहकार्याने ‘आय४सी’द्वारे सायबर गुन्हेगारांची ओळख निश्चित करून त्यांची संशयित म्हणून नोंदणी १० सप्टेंबर २०२४ पासून सुरू करण्यात आली. आतापर्यंत, बँकांकडून मिळालेल्या ११ लाखांहून अधिक संशयित ओळखपत्रांचा विदा आणि लुटीसाठी वापरात आलेल्या २४ लाखांहून अधिक बनावट बँक खात्यांची संशयित म्हणून नोंदणी केली गेली आहे आणि ज्यायोगे ४,६३१ कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम वाचविण्यात आली आहे, असे ते म्हणाले.

गुन्हेगारीला पायबंद

– ९.४२ लाखांहून अधिक सिम कार्ड रद्दबातल

– २,६३,३४८ आयएमईआय (इंटरनॅशनल मोबाईल इक्विपमेंट आयडेंटिटी) क्रमांक स्थगित

– १०,५९९ आरोपींना अटक

– ११ लाखांहून अधिक संशयितांच्या ओळखपत्रांचा बँकांकडे विदा

– लुटीसाठी वापरात आलेल्या २४ लाखांहून अधिक बनावट बँक खाती बंद

– १७.८२ लाखांहून अधिक तक्रारींची नोंद

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

– फसविली गेलेली ५,४८९ कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम हस्तगत