पीटीआय, नवी दिल्ली
सरलेल्या एप्रिल महिन्यात वस्तू आणि सेवाकर अर्थात जीएसटी संकलन वार्षिक तुलनेत १२.६ टक्क्यांनी वाढून २.३७ लाख कोटी रुपयांच्या सर्वोच्च पातळीवर पोहोचले आहे, असे केंद्रीय अर्थमंत्रालयाने गुरुवारी प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीने स्पष्ट केले.
गेल्या वर्षी एप्रिल २०२४ मध्ये जीएसटी संकलन २.१० लाख कोटी रुपये होते. १ जुलै २०१७ रोजी ही अप्रत्यक्ष करप्रणाली लागू झाल्यानंतरचे हे दुसरे मोठे संकलन आहे. तर त्याआधीच्या महिन्यात म्हणजेच मार्च २०२५ मध्ये १.९६ लाख कोटी रुपयांचा महसूल तिजोरीत जमा झाला होता. एप्रिलमध्ये देशांतर्गत क्रियाकलापांमधून एकूण महसूल १०.७ टक्क्यांनी वाढून १.९ लाख कोटी रुपये झाला आहे. तर आयातीतील जीएसटी महसूल २०.८ टक्क्यांनी वाढून ४६,९१३ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. प्राप्तिकर परतावा दिल्यांनतर, एप्रिलमध्ये निव्वळ जीएसटी संकलन ९.१ टक्क्यांनी वाढून २.०९ लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे.
महाराष्ट्र आघाडीवर
राज्यात एप्रिलमध्ये ४१,६४५ हजार कोटी रुपयांचे जीएसटी संकलन झाले. गेल्या वर्षीच्या एप्रिल महिन्याच्या तुलनेत त्यात ११ टक्क्यांची वाढ झाली आहे. एप्रिल २०२४ मध्ये ३७,६७१ कोटी रुपयांचे संकलन झाले होते. दुसऱ्या क्रमांकावर कर्नाटकामधून सर्वाधिक जीएसटी संकलन झाले आहे. नवी दिल्ली ८,२६० कोटी रुपये, तर उत्तर प्रदेश १३,६०० कोटी रुपयांचे संकलन झाले आहे.