वृत्तसंस्था, नवी दिल्ली

खासगी क्षेत्रातील आघाडीची बँक असलेल्या एचडीएफसी बँकेचे गृहकर्ज पुन्हा महाग झाले आहे. रेपो दर स्थिर असूनही विद्यमान कॅलेंडर वर्षात गृहकर्जाच्या दरात तिसऱ्यांदा वाढ केली. एचडीएफसी बँकेने विविध कालावधीच्या निधीवर आधारित कर्ज व्याजदरात (एमसीएलआर) १० ते १५ आधारबिंदूंनी वाढीची घोषणा केली.

सहसा निधीवर आधारित कर्ज व्याजदर हे रिझर्व्ह बँकेच्या रेपो दराशी निगडित असल्याने त्यातील वाढीनुसार बँकांकडून ते बदलेले जातात. मात्र रिझर्व्ह बॅंकेने गेल्या वर्षी एप्रिलपासून रेपो दरात कोणताही बदल केलेला नाही. एचडीएफसी बँकेने नव्याने मंजूर केलेल्या कर्जांसाठी हे नवीन दर लागू होणार आहेत. त्याचा जुन्या कर्जदारांवर कोणताही परिणाम होणार नाही.

हेही वाचा >>> ‘क्रिप्टो सम्राट’ सॅम बँकमन-फ्राइडला २५ वर्षांच्या कारावासाची शिक्षा

५० लाख रुपयांच्या गृहकर्जावरील किमान व्याजदर जानेवारीमध्ये ८.३५ टक्के होता, तर आता किमान गृहकर्ज दर ८.७० टक्क्यांवर पोहोचला आहे. त्यामुळे, तीन महिन्यांच्या कालावधीत, एचडीएफसी बँकेने गृहकर्जाच्या दरात ३५ आधारबिंदूंची वाढ केली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पैसाबाझारने संकलित केलेल्या व्याजदरांसंबंधित आकडेवारीनुसार, ॲक्सिस बँक आणि करूर वैश्य बँकेनेही त्यांच्या नवीन गृहकर्ज दरांमध्ये यावर्षी ५ आधारबिंदूंची वाढ केली आहे. जानेवारीमध्ये, ॲक्सिस बँक आणि करूर वैश्य बँकेचे ५० लाखांच्या कर्जासाठी किमान गृहकर्ज दर अनुक्रमे ८.७० टक्के आणि ८.९५ टक्के असा होता. ते आता मार्चपासून अनुक्रमे ८.७५ टक्के आणि ९ टक्क्यांवर पोहोचले आहेत. सार्वजनिक क्षेत्रातील स्टेट बँक, बँक ऑफ बडोदा आणि बँक ऑफ इंडियाने मात्र कर्जदरात कोणतीही वाढ केलेली नाही.

तारखा             किमान गृहकर्ज दर

३१ जाने. २०२४ ८.३५ टक्के आणि त्यापुढे

२८ फेब्रु. २०२४ ८.५५ टक्के आणि त्यापुढे

२७ मार्च २०२४ ८.७० टक्के आणि त्यापुढे