लोकसत्ता व्यापार प्रतिनिधी

मुंबई : देशातील खासगी क्षेत्रातील आघाडीच्या एचडीएफसी बँकेने मार्चअखेर कर्ज वितरणात २५ लाख कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आणि ठेवीतही २६.५ टक्क्यांची वाढ नोंदवल्यामुळे भांडवली बाजारात बँकेच्या समभाग मूल्यात गुरुवारी ३ टक्क्यांहून अधिक वाढ होऊन ते, १,५२७.६० रुपयांवर झेपावले.

आर्थिक वर्ष २०२३-२४ अखेरीस एचडीएफसी बँकेचे कर्ज वितरण २५.०८ लाख कोटी रुपयांवर पोहोचले. त्याआधीच्या आर्थिक वर्षाच्या अखेरीस हे वितरण १६.१४ लाख कोटी रुपये होते. त्या तुलनेत यंदा त्यात ५५.५ टक्के वाढ झाली आहे. तर तिमाहीगणिक कर्ज वितरणातील वाढ १.६ टक्के अशी आहे. बँकेच्या ठेवी मार्चअखेरीस २३.८ लाख कोटी रुपयांवर पोहोचल्या आहेत. आर्थिक वर्ष २०२२-२३ अखेरीस ठेवी १८.८ लाख कोटी रुपये होत्या आणि त्यात आता २६.५ टक्के वाढ नोंदविण्यात आली आहे.

हेही वाचा >>>दहा हजार टन कांदा निर्यातीला परवानगी

बँकेच्या कर्ज वितरणातील वाढ प्रामुख्याने गृह, ग्राहक आणि वैयक्तिक कर्जे या प्रकारच्या किरकोळ कर्जांतील वाढीमुळे झाली आहे. आर्थिक वर्ष २०२२-२३ च्या तुलनेत २०२३-२४ मध्ये बँकेच्या कर्ज वितरणात १०८ टक्के वाढ नोंदविण्यात आली आहे. बँकेची व्यावसायिक आणि ग्रामीण कर्जे २६ टक्क्यांनी वाढली असून, उद्योग क्षेत्राला कर्जे ४.४ टक्क्यांनी वाढली आहेत.

या अनुकूल व्यावसायिक कामगिरीच्या परिणामी, बराच काळ ठरावीक पातळीवर घुटमळत असलेल्या एचडीएफसी बँकेच्या समभाग मूल्यात हालचाल वाढली आहे. मागील पाच व्यवहार सत्रांत समभागाने ४.७ टक्के परतावा दिला आहे.