मुंबई : हायवे इन्फ्रास्ट्रक्चरच्या प्रारंभिक समभाग विक्रीला (आयपीओ) गुंतवणूकादारांकडून दमदार प्रतिसाद प्राप्त झाला आहे. परिणामी ग्रे मार्केट प्राईस अर्थात जीएमपीमध्ये मोठी वाढ झाली आहे. ५ ऑगस्टपासून खुल्या झालेल्या या आयपीओसाठी पहिल्या काही तासांतच २७.०४ पट भरणा झाला.
राष्ट्रीय शेअर बाजाराकडे उपलब्ध असलेल्या आकडेवारीनुसार, आयपीओच्या दुसऱ्या दिवशी १:३० वाजता ५२.९२ पट अधिक प्रतिसाद नोंदवला गेला. हायवे इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडने आयपीओच्या माध्यमातून १.६० कोटी समभाग विक्रीसाठी उपलब्ध केले आहेत, मात्र त्यातुलनेत ८५ कोटी समभागांसाठी बोली प्राप्त झाली आहे.
बिगर संस्थात्मक गुंतवणूकदार श्रेणीसाठी ६७.२९ पट अधिक भरणा झाला आहे. तर वैयक्तिक गुंतवणूकदारांसाठी राखीव भागाला ५५.९७ पट आणि पात्र संस्थात्मक खरेदीदारांच्या भागाला ५.५४ पट अधिक भरणा प्राप्त आला आहे. यापूर्वी, एचडीएफसी बँक आणि अबन्स फायनान्स प्रायव्हेट लिमिटेडसह सुकाणू गुंतवणूकदारांकडून त्यांनी २३.४० कोटी रुपये उभारले आहेत.
कंपनीने आयपीओसाठी प्रतिसमभाग ६५-७० रुपये किंमत पट्टा निश्चित करण्यात केला असून आयपीओ ७ ऑगस्टपर्यंत खुला राहणार आहे.
जीएमपी किती?
ग्रे मार्केट क्रियाकलापांचा मागोवा घेणाऱ्या संकेतस्थळानुसार, हायवे इन्फ्रास्ट्रक्चरच्या समभागाला ५४ टक्क्यांहून अधिक अधिमूल्य मिळत आहे. कंपनीच्या समभागाला सूचिबद्धतेला ५४.२९ टक्के अधिमूल्य मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
तज्ज्ञांचे मत काय?
केंद्र सरकारकडून सध्या भारतातील पायाभूत सुविधांना प्रोत्साहन देण्यासाठी मोठ्या प्रमाणावर निधी खर्च केला जात आहे. विशेषतः रस्ते, टोलवे आणि शहरी विकास मोठ्या प्रमाणावर होत असून अशावेळी हायवे इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड भांडवली बाजारात पदार्पण करत आहे, असे आयएनव्हॅसेट पीएमएसचे बिझनेस हेड भाविक जोशी यांनी नमूद केले. टोल संकलन आणि ईपीसी पायाभूत सुविधांमध्ये स्थापित कौशल्य असलेली कंपनी असून, कंपनीची धोरणात्मक स्थिती डिजिटल टोलिंग, एक्सप्रेसवे विस्तार आणि शहरी कनेक्टिव्हिटीवर आहे.