हिंडेनबर्ग’चा फसवणुकीचे आरोप करणारा अहवाल; अदानी समूहातील कंपन्यांच्या बाजारभांडवलाचे ४६ हजार कोटींनी पतन | Hindenburg alleges stock manipulation, Adani Group says All allegations are baseless | Loksatta

हिंडेनबर्ग’चा फसवणुकीचे आरोप करणारा अहवाल; अदानी समूहातील कंपन्यांच्या बाजारभांडवलाचे ४६ हजार कोटींनी पतन

आरोप तथ्यहीन असल्याचा समूहाचा दावा

Hindenburg, stock manipulation, Adani Group, baseless
हिंडेनबर्ग’चा फसवणुकीचे आरोप करणारा अहवाल; अदानी समूहातील कंपन्यांच्या बाजारभांडवलाचे ४६ हजार कोटींनी पतन ( संग्रहित छायाचित्र )

पीटीआय, नवी दिल्ली

अमेरिकेतील गुंतवणूक सल्लागार आणि संशोधन संस्था हिंडेनबर्गच्या अहवालानंतर बुधवारी पडत्या भांडवली बाजारात अदानी समूहाच्या कंपन्यांचे समभाग मोठ्या आपटीसह कोसळले. अहवालात केल्या गेलेल्या दाव्याप्रमाणे भारतातील या अग्रणी उद्योग समूहाने अनेक दशकांपासून ताळेबंदात आणि लेख्यांमध्ये खोटेपणासह, समूहातील कंपन्यांच्या समभागांच्या किमतीत लबाडीने फेरफार केल्याचे आरोप आहेत. मात्र हे सर्व आरोप तथ्यहीन आणि एकतर्फी असल्याचा खुलासाही अदानी समूहाने लगोलग केला आहे.

सुमारे १७.८ लाख कोटी रुपये (२१८ अब्ज डॉलर) बाजारमूल्य असलेल्या अदानी समूहाने गेल्या दशकभरात समूहातील कंपन्यांच्या ताळेबंदात कंपनीला अनुकूल बदल लबाडीन केले असून समभागांच्या किमती फुगवण्यासाठी देखील गैरमार्गाने हस्तक्षेप केल्याचा आरोप हिंडेनबर्गने बुधवारी प्रसिद्ध केलेल्या अहवालात केला आहे. हिंडेनबर्गने त्यांच्या दोन वर्षांच्या तपासातून असे निष्कर्ष मांडले असल्याचा दावा केला आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे, अदानी समूहातील अदानी एंटरप्रायझेस लिमिटेड ही कंपनी २०,००० कोटी रुपयांचा निधी उभारण्यासाठी शुक्रवार, २७ जानेवारीपासून ‘एफपीओ’द्वारे समभागांची विक्री सुरू करणार असतानाच, समूहाबद्दल गुंतवणूकविश्वात त्याने साशंकता निर्माण करणारा हा अहवाल समोर आला आहे.
अहवालाच्या प्रसिद्धीसाठी निवडण्यात आलेल्या वेळेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले असून अदानी एंटरप्रायझेस नियोजित भागविक्रीच्या तोंडावर समूहाच्या प्रतिष्ठेला हानी पोहोचवण्याच्या मुख्य उद्देशाने अहवाल जाणीवपूर्वक आणला गेल्याचे अदानी समूहाने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. वस्तुनिष्ठ माहितीच्या विपरीत अहवालात करण्यात आलेल्या दाव्यांमुळे अदानी समूहाला धक्का बसल्याचे त्यात म्हटले आहे.

अदानी समूहाचे संस्थापक आणि अध्यक्ष गौतम अदानी यांनी सुमारे १२० अब्ज डॉलरची निव्वळ संपत्ती जमा केली आहे, ज्यात गेल्या तीन वर्षांत १०० अब्ज डॉलरची भर पडली आहे. मुख्यतः समूहाच्या सात सूचीबद्ध कंपन्यांमधील समभागांच्या किमतीत मोठी वाढ झाली असून या कालावधीत त्यात ८१९ टक्क्यांनी वाढ झाली असल्याचे हिंडेनबर्गच्या अहवालात म्हटले आहे. याशिवाय अहवालात, करमुक्त छावण्या अर्थात ‘टॅक्स हेवन्स’ म्हणून प्रसिद्ध कॅरिबियन बेटे, मॉरिशस ते संयुक्त अरब अमिरातीपर्यंत पसरलेल्या अदानी-कुटुंबाद्वारे नियंत्रित बनावट (शेल) कंपन्यांच्या संकेतस्थळांचा तपशील देण्यात आला आहे, ज्याचा वापर मुख्यतः भ्रष्टाचार, करचोरीसाठी केला जात असल्याचा दावा केला गेला आहे.

अदानी समूहाच्या समभागांमध्ये घसरण किती?

हिंडेनबर्गचा अहवाल समोर आल्यानंतर अदानी समूहाच्या भांडवली बाजारातील सात ही सूचिबद्ध कंपन्यांच्या समभागात मोठी घसरण झाली.

अदानी ग्रीन एनर्जी : १८५५.४५ ५८.१० (-३.०४ टक्के)

अदानी टोटल गॅस ३७४५ -१४०.४५ (-३.६१ टक्के)
अदानी विल्मर ५४४.५० -२८.५० (-५.०० टक्के)

अदानी ट्रान्समिशन २५३४.१० -२२२.१० (-८.०६ टक्के)
अदानी पोर्ट्स ७१२.९० -४७.९५ (-६.३० टक्के)

अदानी इंटरप्रायझेस ३३८९.९५ -५२.९० (-१.५४ टक्के)
अदानी पॉवर २६१.१० -१३.७० (-४.९९ टक्के)

मराठीतील सर्व अर्थवृत्त ( Finance ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 26-01-2023 at 10:42 IST
Next Story
Gold-Silver Price on 26 January 2023: सोन्या-चांदीच्या किंमतीत चढ-उतार, जाणून घ्या तुमच्या शहरातील दर