मुंबई : देशातील आतिथ्य उद्योगाच्या महसुलात पुढील आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये ११ ते १३ टक्के वाढ होण्याच अंदाज असून, देशांतर्गत स्थिर मागणी आणि परदेशी पर्यटकांची वाढलेली संख्या यामुळे या उद्योगाची वाढ आगामी काळात कायम राहणार असल्याचे संकेत आहेत.
क्रिसिल रेटिंग्जच्या अहवालात आतिथ्य (हॉस्पिटॅलिटी) उद्योगाबद्दल आश्वासक अंदाज वर्तविण्यात आला आहे. अहवालानुसार, चालू आर्थिक वर्षात आतिथ्य उद्योगाची वाढ १५ ते १७ टक्के राहील. देशांतर्गत कायम राहिलेली मागणी आणि परदेशी पर्यटकांच्या संख्येत झालेली वाढ यामुळे या क्षेत्रात वाढ होत आहे. नवीन मागणीतील चांगली वाढ आणि पुरवठ्यातील मध्यम स्वरूपाची वाढ यामुळे नजीकच्या काळात या क्षेत्राची कामगिरी समाधानकारक राहणार आहे.
हेही वाचा >>> स्पाईसजेटच्या अजय सिंग यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले, क्रेडिट सुईसचे थकलेले पैसे १५ मार्चपर्यंत परत करण्याचे आदेश
आतिथ्य उद्योगातील कंपन्यांचे करपूर्व उत्पन्न चालू आणि पुढील आर्थिक वर्षात चांगले राहील. तथापि कंपन्यांचा भांडवली खर्च आणि पर्यायाने कर्ज मागणी मर्यादित राहणार आहे. चालू आर्थिक वर्षात देशांतर्गत पर्यटनात वाढ झाली असून, या क्षेत्राच्या वाढीचे हेच प्रमुख कारण ठरले आहे. पुढील आर्थिक वर्षातही हीच स्थिती राहील. अर्थव्यवस्थेची चांगल्या स्थितीमुळे व्यवसायात वाढ होऊन करोना संकटानंतर वाढलेली आरामदायी प्रवासाची मागणी कायम राहील. मागणी चांगली राहणार असल्याने वाढही चांगली होईल, असे क्रिसिल रेटिंग्जचे संचालक आनंद कुलकर्णी यांनी सांगितले.
हॉटेलमधील खोल्यांचे भाडे वाढणार
आतिथ्य उद्योगाची वाढ होत असली तरी पुढील आर्थिक वर्षात हॉटेलमधील खोल्यांचे सरासरी भाडे ५ ते ७ टक्के वाढण्याचा अंदाज आहे. करोना संकटापूर्वी ही सरासरी वाढ १० टक्के होती. पर्यटनात वाढ होणार असल्याने खोल्यांचे सरासरी भाडे वाढेल, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे.