लोकसत्ता व्यापार प्रतिनिधी

मुंबई: प्रदीर्घ वारसा असलेल्या भारतातील नामांकित उद्योग घराण्यांत छोटासा का होईना भागभांडवली हिस्सा मिळविणे, आता शक्य आहे. भारताच्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेले आणि सर्वात मोठ्या व मौल्यवान उद्योगांमध्ये भागीदारीचे गुंतवणूकदारांन जपलेले स्वप्न साकारणारी म्युच्युअल फंड योजना दाखल झाली आहे.

ऐतिहासिकदृष्ट्या पिढी दर पिढी आपला वारसा जपणारी अनेक उद्योग घराणी भारतात आहेत. या बड्या उद्योगसमूहांच्या अनेक कंपन्या शेअर बाजारात सूचिबद्ध देखील आहेत. मीठाच्या उत्पादनापासून, पोलाद, सीमेंट आणि नव-तंत्रज्ञान अशा सर्वच क्षेत्रात त्यांच्या कंपन्या कार्यरत आहेत. विविध मार्गांनी प्राप्त होणारा महसूलाचा प्रवाह, भांडवलाची सुलभ उपलब्धता, मजबूत व प्रतिष्ठित नाममुद्रा आणि ग्राहकांचा विश्वास यांचा लाभ या उद्योगसमूहांना मिळत असतो. परंतु त्याच्या अनेक कंपन्यांपैकी कोणत्या कंपनीने उत्तम आर्थिक कामगिरी बजावली आहे, हे सामान्य गुंतवणूकदारांना हेरता येणे ही अवघड बाब असते. या पार्श्वभूमीवर नव्याने दाखल हा फंड गुंतवणूकदारांसाठी उपयुक्त ठरेल.

बडोदा बीएनपी परिबा म्युच्युअल फंडाने सामान्य गुंतवणूकदारांना बड्या उद्योगसमूहात गुंतवणुकीची संधी देणारा ‘बिझनेस कॉंग्लोमेरेट्स फंड’ प्रस्तुत केला आहे. हा फंड भारतातील वारसासंपन्न उद्योगसमूहांतील कंपन्यांवर लक्ष केंद्रित करून, दीर्घावधीत गुंतवणूकदारांना भांडवल वृद्धी मिळवून देण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आलेला आहे.

नवीन फंड प्रस्तुती (एनएफओ) २ सप्टेंबरपासून गुंतवणुकीसाठी खुली झाली आहे आणि येत्या १५ सप्टेंबर २०२५ रोजी ती बंद होणार आहे. नियमित गुंतवणूक योजना अर्थात सिस्टीमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (एसआयपी) द्वारे दरमहा फक्त ५०० रुपयांमध्ये गुंतवणूकदार भारतातील सर्वात प्रतिष्ठित उद्योगसमूहात गुंतवणूक करू शकतील. व्यावसायिक निधी व्यवस्थापक आणि विश्लेषकांच्या मदतीच्या सहाय्याने गुंतवणुकीसाठी योग्य अशा संभाव्य कंपन्याही निवडल्या जातील.

“भारतीय शेअर बाजारातील नोंदणीकृत कंपन्यांच्या माध्यमातून अनेक पिढ्यांपासून कार्यरत असलेल्या उद्योगसमूहांच्या समभागाचा काही हिस्सा खरेदी करण्याची संधी बडोदा बीएनपी परिबा बिझनेस कॉंग्लोमेरेट्स फंडामुळे आमच्या गुंतवणूकदारांना मिळणार आहे. मोठा वारसा व परंपरा असलेल्या उद्योगसमूहांनी सुरू केलेल्या कोणत्याही नवीन कंपनीला सुरुवातीलाच स्पर्धात्मक फायदा मिळत असतो,” याकडे बडोदा बीएनपी परिबा अॅसेट मॅनेजमेंट इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे मुख्य गुंतवणूक अधिकारी (इक्विटी) संजय चावला यांनी लक्ष वेधले.

या नवीन योजनेसाठी बीएसई सिलेक्ट बिझनेस ग्रुप्स इंडेक्स हा मानदंड निर्देशांक असणार आहे. एकासमयी किमान चार उद्योगसमूहांच्या कंपन्यांमध्ये हा फंड गुंतवणूक करेल. कोणत्याही उद्योगसमूहातील उच्चतम गुंतवणूक ही मालमत्तेच्या कमाल २५ टक्क्यांपर्यंतच मर्यादित ठेवली जाईल. या फंडाचे व्यवस्थापन वरिष्ठ निधी व्यवस्थापक जितेंद्र श्रीराम आणि संशोधन विश्लेषक कुशांत अरोरा हे पाहणार आहेत.

या फंडाच्या माध्यमातून भारतातील दिग्गज उद्योग घराण्यांच्या एका हिश्शाची मालकी मिळविण्यास बडोदा बीएनपी परिबा गुंतवणूकदारांना सक्षम करत आहे. त्यामुळे संपत्ती निर्मितीची प्रक्रिया सुलभ, संरचित होण्यास, गुंतवणुकीसाठी ठरविलेले उद्दिष्ट हे व्यावसायिक पद्धतीने साध्य करता येणार आहे.