पीटीआय, नवी दिल्ली
केंद्राचे सातत्यपूर्ण प्रयत्न आणि पाठबळामुळे देशातील नोंदणीकृत नवउद्यमी (स्टार्टअप) उपक्रमांची संख्या ३१ जानेवारी २०२५ अखेर १,६१,१५० वर पोहोचली आहे, अशी माहिती वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी मंगळवारी संसदेत दिली. उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाकडून (डीपीआयआयटी) नवउद्यमींना मान्यता देण्यात येते.

महत्त्वाकांक्षी ‘स्टार्टअप इंडिया’ उपक्रमांतर्गत नोंदणीकृत नवउद्यमी कर आणि करोत्तर वित्तीय प्रोत्साहन मिळविण्यासाठी पात्र ठरतात. देशात नवउद्यमी संस्कृतीला चालना देण्यासाठी एक मजबूत परिसंस्था तयार करण्याच्या उद्देशाने १६ जानेवारी २०१६ रोजी ‘स्टार्टअप इंडिया’ उपक्रम सरकारने सुरू केला. अर्थव्यवस्थेत वाढीसह, उद्योजकतेला प्रोत्साहन आणि मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी निर्माण होतील, असे उद्दिष्ट यातून ठेवण्यात आले. हे मान्यताप्राप्त नवउद्यमी उपक्रम माहिती-तंत्रज्ञान सेवा, वित्त तंत्रज्ञान, हार्डवेअर तंत्रज्ञान, एंटरप्राइज सॉफ्टवेअर, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि नॅनोटेक्नॉलॉजी यांसारख्या ५६ वैविध्यपूर्ण क्षेत्रांमध्ये पसरलेले आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

महाराष्ट्राची आघाडी कायम

देशात सर्वाधिक मान्यताप्राप्त नवउद्यमी उपक्रम महाराष्ट्रात आहेत. उद्योजकतेला प्रोत्साहन देण्याच्या धोरणामुळे महाराष्ट्रात २८,५११ हून नवउद्यमी उपक्रम सध्या कार्यरत आहेत. त्यापाठोपाठ कर्नाटकात १६,९५४ नवउद्यमी उपक्रमांना मान्यता आहे.