नवी दिल्ली: नवीन व्यवसाय आणि आंतरराष्ट्रीय विक्रीत झालेली वाढ या कारणाने देशातील खासगी क्षेत्राची सक्रियता जूनमध्ये १४ महिन्यांतील उच्चांकी पातळीवर पोहोचल्याचे सोमवारी जाहीर झालेल्या मासिक सर्वेक्षणाने स्पष्ट केले.
देशातील निर्मिती आणि सेवा क्षेत्रातील खरेदी व्यवस्थापकांचा कल दर्शविणारा एचएसबीसी इंडियाचा संयुक्त पीएमआय निर्देशांक जून महिन्यात ६१ गुणांवर नोंदला गेला. मेमध्ये हा गुणांक ५९.३ वर होता. निर्मिती आणि सेवा क्षेत्राच्या सक्रियतेचे एकत्रित मूल्यमापन या निर्देशांकाच्या माध्यमातून होते. हा निर्देशांक ५० गुणांपेक्षा कमी असल्यास आकुंचन आणि ५० गुणांवर विस्तारपूरकता दर्शवितो. उल्लेखनीय म्हणजे सलग ४७ व्या महिन्यांत हा निर्देशांक ५० गुणांवर राहिला आहे.
एस अँड पी ग्लोबल संस्थेकडून निर्मिती क्षेत्रातील ४०० आणि सेवा क्षेत्रातील ४०० कंपन्यांचे सर्वेक्षण केले जाते. त्याआधारे हा निर्देशांक तयार केला जातो. निर्मिती क्षेत्राच्या सक्रियतेत वाढ होऊन त्याचा पीएमआय निर्देशांक जूनमध्ये ५८.४ गुणांवर पोहोचला आहे. तो मेमध्ये ५७.६ गुणांवर होता. तर सेवा क्षेत्राबाबत मे महिन्यांतील ५८.८ वरून पीएमआय निर्देशांक जूनमध्ये ६०.७ गुणांवर पोहोचला आहे.
पहिल्या तिमाहीच्या अखेरीस निर्मिती आणि सेवा क्षेत्राने नवीन व्यवसायात मोठी वाढ नोंदविली आहे. नवीन कार्यादेश, रोजगार, वितरकांकडून वितरणाचा कालावधी आणि उत्पादनांचा साठा या सर्वच पातळीवर एप्रिल २०२४ नंतरची सर्वाधिक सुधारणा जूनमध्ये दिसून आली आहे , असे सर्वेक्षणात म्हटले आहे. दरम्यान, निर्मिती क्षेत्राचा जून महिन्याचा अंतिम पीएमआय निर्देशांक १ जुलैला आणि सेवा क्षेत्राचा तसेच, संयुक्त अंतिम पीएमआय निर्देशांक ३ जुलैला जाहीर केला जाणार आहे.
निर्यात कार्यादेशांत सातत्याने वाढ
देशाच्या संयुक्त पीएमआय निर्देशांकांत जून महिन्यात चांगली वाढ दिसून येत आहे. नवीन निर्यात कार्यादेशात सातत्यपूर्ण वाढ सुरू असल्याने खासगी क्षेत्राच्या सक्रियतेला गती मिळत आहे. जागतिक पातळीवरून वाढत असलेली मागणी आणि निर्मिती क्षेत्रातील प्रलंबित कार्यादेश यामुळे रोजगार निर्मितीतही जोमदार वाढ सुरू आहे, असे एचएसबीसी इंडियाच्या मुख्य अर्थतज्ज्ञ प्रांजुल भंडारी यांनी नमूद केले.