नवी दिल्ली : भारतीय अर्थव्यवस्थेने सरलेल्या २०२४-२५ या आर्थिक वर्षात ६.५ टक्के दराने वाढ साधली, असे शुक्रवारी जाहीर झालेल्या अधिकृत आकडेवारीने स्पष्ट केले. गत आर्थिक वर्षात नोंदविलेल्या ९.२ टक्क्यांच्या तुलनेत ती लक्षणीय मंदावले, इतकेच नाही तर करोना साथीनंतरच्या चार वर्षांतील तिचा हा नीचांक आहे.

राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने शुक्रवारी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, २०२४-२५ आर्थिक वर्षासाठी नोंदवला गेलेला ६.५ टक्क्यांचा विकासदर हा जागतिक अनिश्चितता आणि देशांतर्गत मंदावलेली खासगी गुंतवणूक पाहता विविध अर्थसंस्थांसह, सरकारच्याही पूर्वअंदाजांपेक्षा सरस आला आहे. जगातील सर्वात वेगवान अर्थव्यवस्था म्हणून देश आपले बिरूद कायम राखेल, असा विश्वासही त्यामुळे देशाचे मुख्य आर्थिक सल्लागार व्ही. अनंत नागेश्वरन यांनी व्यक्त केला.

एनएसओने दुसऱ्या अग्रिम अंदाजात २०२४-२५ साठी देशाचा विकास दर ६.५ टक्के राहण्याचा अंदाज वर्तवला होता. भारताचा प्रतिस्पर्धी असलेल्या चीनने वर्ष २०२५ च्या पहिल्या तिमाहीत (जानेवारी-मार्च २०२५) ५.४ टक्के दराने वाढ साधली आहे. भारतीय अर्थव्यवस्थेचे आकारमान चालू किमतींवर ३३०.६८ लाख कोटी रुपये म्हणजेच ३.९ ट्रिलियन डॉलरपर्यंत वाढले आहे. पुढील काही वर्षांत ५ ट्रिलियन डॉलरचे लक्ष्य साध्य करण्यासाठी पायाभूत सुविधांच्या निर्मितीवर सरकारने लक्ष केंद्रित केले आहे.

चौथ्या तिमाहीत सर्वोच्च वाढ

जानेवारी ते मार्च २०२५ या आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीत मात्र ७.४ टक्के असे वर्षातील सर्वोच्च विकासदर नोंदविला गेला. गेल्यावर्षी याच तिमाहीत तो ८.४ टक्के राहिला होता. मुख्यतः उत्पादन क्षेत्राची पीछेहाट झाल्याने चौथ्या तिमाहीत विकासदर घटला आहे. त्या उलट ग्रामीण भागातून दमदार मागणी आणि सरकारकडून भांडवली खर्चात वाढीने अर्थव्यवस्थेला हात दिला.

क्षेत्रवार कामगिरी कशी?

उत्पादन क्षेत्रातील वाढ २०२३-२४ मधील १२.३ टक्क्यांवरून सरलेल्या आर्थिक वर्षात ४.५ टक्क्यांपर्यंत घसरली. तथापि, कृषी क्षेत्रातील वाढ मागील आर्थिक वर्षातील २.७ टक्क्यांवरून, २०२४-२५ मध्ये ४.६ टक्क्यांपर्यंत विस्तारली आहे. चौथ्या तिमाहीत तर ही वाढ ५ टक्क्यांच्या पातळीवर पोहोचल्याचे दिसून आले. क्षेत्रवार वेध घेतल्यास, बांधकाम क्षेत्राने दमदार ९.४ टक्क्यांची वाढ २०२४-२५ मध्ये दर्शविली. त्या पाठोपाठ सार्वजनिक प्रशासन, संरक्षण आणि पूरक सेवांमध्ये ८.९ टक्क्यांची, तर वित्तीय सेवा, स्थावर मालमत्ता आणि व्यावसायिक सेवांमध्ये ७.२ टक्क्यांची वाढ दिसून आली. त्या उलट वीज, वायू, पाणीपुरवठा आणि इतर उपयुक्तता सेवांमधील वाढ गेल्या वर्षीच्या ८.८ टक्क्यांच्या तुलनेत यंदा ५.४ टक्क्यांपर्यंत खालावली आहे.

चौथ्या तिमाहीत आर्थिक घडामोडींतील गतिमानता ही विद्यमान आर्थिक वर्षातील पहिल्या तिमाहीतही वाढीसाठी परिस्थिती कायम आहे. एप्रिल-जून तिमाहीत अर्थव्यवस्थेने मजबूत पायावर वाटचाल सुरू केली आहे. – व्ही. अनंत नागेश्वरन, मुख्य आर्थिक सल्लागार

करोनापश्चात वाढीचा तळ

२०२४-२५ – ६.५ टक्के

२०२३-२४ – ९.२ टक्के

२०२२-२३ – ७.६ टक्के

२०२१-२२ – ९.७ टक्के

२०२४-२५ मधील तिमाहीगणिक वाढ

जानेवारी-मार्च २०२५ : ७.४ टक्के

ऑक्टोबर-डिसेंबर २०२४ : ६.४ टक्के,

जुलै-सप्टेंबर २०२४ : ५.६ टक्के

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एप्रिल-जून २०२४ : ६.५ टक्के